दुबई, 5 नोव्हेंबर : सध्या टी-20 वर्ल्ड कपचा (T-20 World cup) महासंग्राम `यूएई`मध्ये (UAE) सुरू आहे. या वर्ल्ड कप सीरिजमध्ये टीम इंडियाला (Team India) पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीमकडून पराभवाचा सामना करावा लागला, तर अफगणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळाला. आता टीम इंडियाचा सामना स्कॉटलंड (Scotland) या तुलनेनं नवख्या टीमशी होत आहे. टी-20 विश्वचषकातल्या या 37व्या मॅचमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा नक्कीच असेल; मात्र स्कॉटलंडची टीम तुलनेनं नवी असली तरी टीम इंडियाला विजयासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्थात याला प्रमुख कारण आहे ते म्हणजे डावखुरा स्पिनर मार्क वॉट (Spinner Mark Watt). स्कॉटलंडची टीम सुपर-12 मधल्या तीनही मॅचेसमध्ये पराभूत झालेली असली तरी या टीममधील खेळाडूंनी अनेक दिग्गज खेळाडूंचं लक्ष वेधलं आहे. मार्क वॉट हा त्यापैकीच एक. मार्क वॉटची तुलना सध्या पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू आणि बॉलर वासिम अक्रमशी (Wasim Akram) होत आहे.
स्कॉटलंड टीमचा डावखुरा स्पिनर मार्क वॉटच्या खेळामुळे सध्या विशेष चर्चेत आहे. मार्क वॉटची विशिष्ट शैलीतली बॉलिंग अनेक बॅट्समनसाठी (Batsman) डोकेदुखी ठरत आहे. कारण वॉटच्या बॉलिंगवर रन्स (Runs) काढणं हे कोणत्याही बॅट्समन्सना आव्हान वाटत आहे. ही स्थिती पाहता मार्क वॉट हा टीम इंडियासाठीही डोकेदुखी ठरणार असा अंदाज व्यक्त होत आहे.
मार्क वॉटच्या बॉलिंगची काही खास अशी वैशिष्ट्यं आहेत. तो स्पिनर तर आहेच. परंतु, अचूक यॉर्कर (Yorker) टाकण्यातही माहीर आहे. त्यामुळे स्कॉटिश कॅप्टन डेथ ओव्हर्समध्येही त्याचा वापर करतो. मार्क वॉटची यॉर्कर शैली बघता त्याची तुलना वासिम अक्रमशी केली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये मार्क वॉटनं दमदार बॉलिंग करून न्यूझीलंडच्या (New Zealand) बॅट्समन्सना घाम फोडला होता. त्यानं किवी टीमविरुद्ध 4 ओव्हर्समध्ये केवळ 13 रन्स दिले होते आणि एक विकेट घेतली होती. या मॅचमध्ये वॉटने डेवॉन कॉनवेला आउट केलं होतं.
डावखुरा स्पिनर मार्क वॉटने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 6 मॅचेस खेळल्या असून, 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट (Economy Rate) 6 रन प्रति ओव्हरपेक्षा कमी आहे. मार्क वॉटनं 5.12 या इकॉनॉमी रेटनं रन्स दिले आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 6 मॅचेसमध्ये वॉटनं एकाही बॅट्समनला फोर (Four) किंवा सिक्स (Six) मारण्याची संधी दिलेली नाही. हे वॉटच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india