शारजाह, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानने भारतानंतर आता न्यूझीलंडला (Pakistan vs New Zealand) धक्का दिला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 135 रनचं आव्हान पाकिस्तानने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पूर्ण केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान काही काळ अडचणीत आलं होतं, पण आसिफ अलीने (Asif Ali) 12 बॉलमध्ये नाबाद 27 रन आणि शोएब मलिकने (Shoaib Malik) नाबाद 26 रन करून पाकिस्तानचा विजय सोपा केला. मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) सर्वाधिक 33 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोदीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर मिचेल सॅन्टनर, टीम साऊदी आणि ट्रेन्ट बोल्ट यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडला पहिले बॅटिंगला पाठवलं. गप्टील आणि डॅरेल मिचेल या ओपनरनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली, पण यानंतर न्यूझीलंडची बॅटिंग गडगडली. मिचेल आणि कॉनवेने प्रत्येकी 27 रन आणि केन विलियमसनने 25 रन केले. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 134 रन केले. पाकिस्तानच्या हारिस राऊफने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर शाहिन आफ्रिदी, इमाद वसीम आणि मोहम्मद हफीजला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळाल्यामुळे आता पाकिस्तानचा सेमी फायनलला पोहोचण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. पाकिस्तानचे उरलेले सामने आता अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध उरले आहेत. भारत आणि न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी बघता पाकिस्तानसाठी हे सामने सोपे ठरण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचं वेळापत्रक
29 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30वाजता
2 नोव्हेंबर- पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30वाजता
7 नोव्हेंबर- पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7.30 वाजता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Pakistan, T20 world cup