नवी दिल्ली, 16 जुलै : T20 विश्वचषकाचे (T20 World Cup) अंतिम 2 संघही आता निश्चित झाले आहेत. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. यामुळे या दोन्ही संघांना स्पर्धेची तिकिटे मिळाली आहेत. विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात (Australia) सामने होणार आहेत. टीम इंडियालाही (Team India) यावेळी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. 2007 मध्ये भारतीय संघाने शेवटचा T20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून भारतीय संघ रिकाम्या हाताने परतत आहे. भारत 15 वर्षांपासून विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. रोहित शर्माचा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून चांगला रेकॉर्ड आहे, त्यामुळे यंदा त्याच्याकडून तमाम भारतीयांना अपेक्षा लागून राहिल्या आहेत.
क्वालिफायरच्या उपांत्य फेरीत झिम्बाब्वेने पापुआ न्यू गिनीचा पराभव केला, तर नेदरलँड्सने अमेरिकेचा पराभव केला. अशाप्रकारे अमेरिकेचे वर्ल्डकपमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. नेदरलँड्सने अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात अमेरिकेचा संघ प्रथम खेळताना केवळ 138 धावाच करू शकला. कर्णधार मानंक पटेलने सर्वाधिक 32 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सने 19 षटकांत 3 गडी राखून लक्ष्याचा पाठलाग केला. उद्या अंतिम फेरीत या संघाचा सामना यजमान झिम्बाब्वेशी होणार आहे.
झिम्बाब्वे 27 धावांनी जिंकली -
प्रथम खेळताना झिम्बाब्वेने 5 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांची मोठी धावसंख्या उभारली. वेस्ली माधवरेने 42 धावा केल्या. याशिवाय कर्णधार क्रेग इर्विनने 38 आणि रेगिस चकाबवाने 30 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात पीएनजीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा करू शकला. टोनी उराने सर्वाधिक 66 धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आशीर्वाद मुजरबानीने 2 बळी घेतले.
दोन्ही संघांचा पहिल्या फेरीत प्रवेश -
यासह झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने विश्वचषकासाठी फेरी-1 मध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये एकूण 8 संघांना संधी देण्यात आली आहे. ते 2 गटांमध्ये विभागले गेले आहेत. दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-12 फेरीत प्रवेश करतील. नामिबिया, श्रीलंका आणि यूएईला पहिल्या फेरीत अ गटात स्थान मिळाले आहे. नेदरलँड आणि झिम्बाब्वे यांच्यातील अंतिम फेरीचा उपविजेता संघ या गटात खेळेल. तर आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि नेदरलँड आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यातील विजयी संघाला ब गटात स्थान देण्यात आले आहे.
सुपर-12 मध्येही 2 गट
सुपर-12 मध्ये 2 गट तयार करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना गट 1 मध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय 2 संघांना पात्रता फेरीतूनही स्थान मिळेल. गट-अ मधील विजेता आणि गट-ब मधील उपविजेता संघाला येथे खेळायचे आहे. तर बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना गट 2 मध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय फेरी-1 मधील गट-ब मधील विजेता आणि गट-अ मधील उपविजेत्या संघालाही स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजचेही खेळण्याची शक्यता जास्त आहे. दोन्ही गटातील टॉप 2 संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबरला होणार आहेत. फायनल 13 नोव्हेंबरला होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. ऑस्ट्रेलियात सामने होणार असल्याने त्यांच्या संघाचे पारडे भारी मानले जात आहे.
टीम इंडियाचे सामने असे होणार -
23 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान
27 ऑक्टोबर वि. गट अ उपविजेता
30 ऑक्टोबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका
2 नोव्हेंबर विरुद्ध बांगलादेश
6 नोव्हेंबर विरुद्ध ग्रुप बी चॅम्पियन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 cricket, T20 world cup