दुबई, 5 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सुरुवातीच्या दोन खराब सामन्यांनंतर टीम इंडियाने (Team India) जोरदार पुनरागमन केलं आहे. अफगाणिस्तानचा 66 रननी पराभव केल्यानंतर भारताने स्कॉटलंडलाही धूळ चारली. स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान भारताने (India vs Scotland) फक्त 39 बॉलमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केलं. केएल राहुलने 19 बॉलमध्ये 50 तर रोहित शर्माने 16 बॉलमध्ये 30 रन केले. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 2 विकेट घेण्यात यश आलं, यामुळे स्कॉटलंडचा फक्त 85 रनवर ऑल आऊट झाला.
स्कॉटलंडविरुद्धच्या या विजयामुळे टीम इंडियाचा नेट रनरेटही ग्रुपमधला सर्वोत्तम झाला आहे. ग्रुपमधला सर्वोत्तम रनरेट करण्यासाठी स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाला 7.1 ओव्हरमध्ये पार करणं गरजेचं होतं, पण भारताने हे आव्हान 4 बॉल आधीच म्हणजे 6.3 ओव्हरमध्ये पार केलं. यामुळे भारताचा नेट रनरेट आता +1.619 एवढा झाला आहे. 4 मॅचमध्ये 2 विजय आणि 2 पराभवांसह भारताच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4 मॅचमध्ये 4 विजयांसह पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे पाकिस्तान आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या स्थानासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. न्यूझीलंडने 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे 6 पॉईंट्ससह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.277 एवढा आहे. अफगाणिस्तानने भारताएवढेच सामने जिंकले आहेत, पण त्यांचा नेट रनरेट भारतापेक्षा कमी +1.481 असल्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
टीम इंडियाच्या आशा अफगाणिस्तानवर
टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 7 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आणि 8 नोव्हेंबरला भारताने नामिबियाला पराभूत केलं, तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवेल. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा 10 रनने पराभव केला, तर भारताला नामिबियाविरुद्धचा सामना 2 रननी जिंकावा लागेल.
टीम इंडियाची स्पर्धेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सामनाही भारताने 8 विकेटने गमावला. या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहलीने टॉस गमावला, तेदेखील पराभवाचं मुख्य कारण ठरलं. युएईमध्ये या वातावरणात दुसऱ्या इनिंगवेळी मोठ्या प्रमाणावर धुकं पडतं, ज्यामुळे बॉलरला बॉल पकडताना अडचणींचा सामना करावा लागतो, तसंच बॅट्समनसाठीही शॉट खेळणं सोपं होऊन जातं. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला दोन्ही वेळा पहिले बॅटिंग करावी लागली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india