अबु धाबी, 6 नोव्हेंबर : सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या (West Indies) पदरी यंदा निराशा आली. सुपर-12 स्टेजमध्ये 5 पैकी 4 सामने हरल्यामुळे गतविजेत्या वेस्ट इंडिजचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies vs Australia) 8 विकेटने पराभव झाला. हा सामना वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्रिस गेल (Chris Gayle)आणि ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) यांच्यासाठी अखेरचा ठरला. या सामन्यामध्ये क्रिस गेल 15 रन करून तर ब्राव्हो 10 रन करून आऊट झाला. टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसल्याचं ब्राव्होने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यावेळीच सांगितलं होतं. क्रिस गेलने मात्र याबाबतची अधिकृत घोषणा केली नसली, तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गेलच्या हावभावावरून हा त्याचाही अखेरचा सामना असेल, असं सांगितलं जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने क्रिस गेलला बोल्ड केलं, यानंतर डग आऊटच्या दिशेने जाताना गेलने प्रेक्षकांच्या दिशेने बॅट उंचावली, यानंतर वेस्ट इंडिज टीममधल्या त्याच्या सहकाऱ्यांनी गेलसाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या. ब्राव्हो आऊट झाल्यानंतर त्यानेही प्रेक्षकांच्या दिशेने बॅट उंचावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.
Chris Gayle! ❤️#WIvsAUS pic.twitter.com/ZpHN3YkZrm
— 'Z (@_NyrraZo) November 6, 2021
38 वर्षांच्या ड्वॅन ब्राव्होने 2004 साली वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन केलं. 16 वर्षांच्या करियरमध्ये ब्राव्होने 40 टेस्ट, 164 वनडे आणि 90 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या.
42 वर्षांचा क्रिस गेल टी-20 क्रिकेटमधला सगळ्यात महान खेळाडू गणला जातो. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 14 हजारांपेक्षा जास्त रन आहेत, याशिवाय त्याने 22 शतकंही केली आहेत. अन्य कुठल्या खेळाडूला 9 शतकांचा आकडाही गाठता आलेला नाही. या 22 शतकांपैकी 16 शतकांनंतर गेलच्या टीमचा विजय झाला. गेलने टी-20 मधली 12 शतकं आशिया खंडात लगावली. वनडेमध्येही त्याच्या नावावर 10 हजारांपेक्षा जास्त रन आहेत. टेस्टमध्येही त्याने 333 रनची खेळी केली.
टी-20 मध्ये सगळ्यात जलद शतक करण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. 2013 आयपीएलमध्ये गेलने आरसीबीकडून खेळताना पुण्याविरुद्ध 30 बॉलमध्येच शतक ठोकलं होतं. त्या सामन्यात गेलने नाबाद 175 रनची खेळी केली होती. टी-20 च्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी खेळी होती. टी-20 फॉरमॅटमध्ये गेलने 1500 पेक्षा जास्त सिक्स आणि 3 हजारांपेक्षा जास्त फोर मारल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chris gayle, T20 world cup, West indies