नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup ) बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात खेळणारा पाकिस्तान संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. टी-२० वर्ल्डकप २०१६ मध्ये पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघाने यावेळी चांगली कामगिरी केली आहे. २००९ मध्ये वर्ल्डकप जिंकणारा पाकिस्तान सध्याच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामन्यात पराभूत झालेला नाही. पाकिस्तानचा यंदाचा परफॉर्मन्स पाहता टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी बाबरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने स्वत:ला तंदुरुस्त ठेवल्यास आणि प्रेरीत राहिल्यास कारकिर्दीच्या अखेरीस तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनेल यात शंका नाही, असा विश्वास गावस्कर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पाकिस्तानच्या कर्णधाराच्या प्रेरणादायी आणि शांत नेतृत्व शैलीचे कौतुक केले. कारण टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या यशात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.
पाकिस्तानचा महान कर्णधार बनू शकतो
पाकिस्तान हा नेहमीच अप्रत्याशित संघ राहिला आहे. संघात गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. या स्पर्धेतील संघाच्या चांगल्या कामगिरीचे कारण त्यांचा उत्साह होता. या वेळी बाबरच्या नेतृत्वाखाली हा संघ अतिशय शांत आणि खेळाबाबत अतिशय जागरूक दिसत होता. बाबरने स्वत:ला तंदुरुस्त आणि प्रेरित ठेवल्यास तो या खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक ठरणार आहे यात शंका नाही. एवढेच नाही तर तो पाकिस्तानचा महान कर्णधार बनू शकतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाकिस्तानी कर्णधार सामन्याची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेले बदल. ते पूर्णपणे अचूक आहेत. असे सांगत बाबरच्या नेतृत्वाचे गावस्कारांनी कौतुक केले. तसेच ते पुढे म्हणाले, संघाच्या गोलंदाजीत खूप वैविध्य आहे. या कारणास्तव त्याच्याकडे गोलंदाजांची कमतरता नाही. कोणत्याही कर्णधारासाठी ही सर्वोत्तम स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीतही त्याला लवकर विकेट्स घेण्याची गरज आहे. कारण फिंच-वॉर्नर यांची जुगलबंती रंगली तर ऑस्ट्रेलियाला रोखणे कठीण होईल.