पटणा, 14 जुलै : सुधीर कुमार (Sudhir Kumar) याची ओळख क्रिकेट चाहत्यांना वेगळी करून द्यायची गरज नाही. भारताच्या प्रत्येक मॅचवेळी स्टेडियममध्ये अंगाला तिरंग्याचा रंग लावून आणि हातात भारताचा झेंडा घेऊन टीम इंडियाला (Team India) चिअर करताना सुधीर दिसतो. हाच सुधीर कुमार आता मुझफ्फरपूरमध्ये एक मंदिर बांधणार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) हे मंदिर असेल. मंदिर निर्माण करण्यासाठी सुधीर आता पैसे गोळा करत आहे. पैशांची जुळवाजुळव झाल्यानंतर मंदिराचं काम सुरू होणार आहे.
न्यूज 18 शी बोलताना सुधीर कुमारने ही माहिती दिली. 'जेव्हा सचिनला भेटलो तेव्हापासूनच तो माझ्यासाठी देवासारखा झाला. देवाला देवळात जागा मिळणार नाही, तर कुठे मिळणार. यासाठी मी सचिन तेंडुलकरचं मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 2003 साली पहिल्यांदा सचिनला भेटलो. सचिनची भेट घेतल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी तिच्याशी लग्न केलं,' असं सुधीर म्हणाला.
बायकोबद्दल विचारलं असता सचिनला भेटलो आणि क्रिकेटलाच आपली पत्नी बनवलं, असं उत्तर सुधीरने दिलं. 'सचिनला भेटल्यानंतर नोकरी सोडून दिली, रोज क्रिकेटमध्येच हरवून जायचो. सचिन सरांची मॅच असायची तेव्हा तिकडे जायचो. सचिन सरच माझी व्यवस्था करायचे. माझी आर्थिक परिस्थिती नीट नाही, पण मी कधीच त्यांच्याकडे मदत मागितली नाही. सचिन सरांबरोबरच भारतीय टीममधल्याही अनेकांनी आर्थिक मदतीसाठी विचारलं, पण मी नकार दिला,' असं सुधीरने सांगितलं.
'कोरोनामुळे 2020 पासून सचिनची भेट झाली नाही, पण बोलणं होतं. ते नेहमी माझ्याविषयी विचारतात. भारतीय टीम श्रीलंकेला जाणार आहे, मलाही तिकडे जाऊन भारतीय टीमचं धैर्य वाढवायचं आहे, पण कोरोनामुळे समस्या निर्माण झाली आहे. कोरोनामुळे काही अडचण आली नाही आणि श्रीलंका सरकारने परवानगी दिली तर तू जाऊ शकतोस, असं सचिन सरांनी मला सांगितलं', असं वक्तव्य सुधीरने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sachin tendulkar