मुंबई, 2 जुलै : सर्वाधिक 50 ओव्हरचे वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला (Australia) अजून एकही टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकता आलेला नाही, त्यामुळे यावर्षाच्या शेवटी कांगारूं टीम ही कसर भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. पण पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो. ऍशेस (Ashes) सीरिजसाठी आपण टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेऊ शकतो, असे संकेत स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) दिले आहेत. स्मिथला सध्या दुखापत झाली आहे, या दुखापतीतून तो सावरत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही फॉरमॅटमधला महत्त्वाचा खेळाडू असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या कोपराला दुखापत झाली आहे. यामुळे त्याला वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्धची सीरिज खेळता येणार नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याबाबत स्मिथने स्पष्टपणे नकार दिला नाही, पण या स्पर्धेसाठी आपण पूर्णपणे फिट व्हायचा प्रयत्न करू, असं स्मिथ म्हणाला.
'टी-20 वर्ल्ड कपला अजून वेळ आहे. दुखापतीतून मी बरा होत आहे. टी-20 टीममध्ये सहभागी व्हायला मला आवडेल, पण माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ऍशेससाठी फिट होणं माझं लक्ष्य आहे. मागच्या काही ऍशेसमध्ये मी जशी कामगिरी केली, त्याचीच पुनरावृत्ती करण्याची माझी इच्छा आहे. यासाठी मला टी-20 वर्ल्ड कपला मुकावं लागलं तरी चालेल, पण तसं करण्याची माझी इच्छा नाही,' असं स्मिथने क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना सांगितलं. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, Steven smith, T20 world cup