मुंबई, 19 जुलै : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सध्याचा जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. पण स्मिथला जेव्हा विरोधी टीममधल्या सर्वोत्तम बॅट्समनचं नाव विचारलं तेव्हा त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) असं उत्तर दिलं. जगातला महान खेळाडू असणाऱ्या सचिनने आपल्या करियरमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना त्रास दिला आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये रेकॉर्डब्रेक रन केले.
ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath), शोएब अख्तर (Shoaib Akhtar) पासून ते जेम्स अंडरसन (James Anderson) आणि मुथय्या मुरलीधरनपर्यंत (Muttiah Muralitharan) सचिनने अनेक दिग्गजांवर आक्रमण केलं. सचिनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 23 वर्षांपेक्षा जास्त चालली. क्रिकेटच्या मैदानात त्याने अनेक विक्रम केले.
स्टीव्ह स्मिथने आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर एका प्रश्नोत्तराच्या सत्राचं आयोजन केलं होतं. यात स्मिथला अनेक प्रश्न विचारण्यात आले. स्मिथने आपल्या आवडत्या खाण्यासह आयपीएलमधले (IPL) अनुभवही त्याच्या चाहत्यांना सांगितले.

स्मिथला जेव्हा त्याच्याविरुद्ध खेळलेल्या सर्वोत्तम बॅट्समनबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्याने सचिन तेंडुलकरला टॅग केलं. स्मिथने सचिनच्या निवृत्तीच्या तीन वर्ष आधी 2010 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. स्मिथने सचिन तेंडुलकरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा आऊटही केलं.
मोहालीमध्ये 2013 साली भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) टेस्ट मॅचमध्ये स्मिथने सचिनची विकेट घेतली होती. सचिनला स्मिथने 37 रनवर माघारी धाडलं होतं, पण भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला होता. त्याच वर्षी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकांचा सचिनचा विक्रम आजही कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.