मुंबई, 7 जानेवारी : सध्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेत आत्तापर्यंत दोन सामने खेळवले गेले असून यात भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांची गुण संख्या 1-1 अशी आहे. परंतु भारत विरुद्ध मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि समालोचक कुमार संगकारा याची अचानक तब्बेत बिघडल्यामुळे त्याला पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. आता संगकारावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक कुमार संगकाराला भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी अचानक थंडी भरुन अंग थरथरत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगकाराला डिहायड्रेशन होऊन ताप आल्यामुळे थकवा जाणवत होता. बुधवार 4 जानेवारीला रात्री आठ वाजता त्याला रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आले, तर गुरुवारी झालेल्या भारत-श्रीलंका सामन्यापूर्वी रुग्णालयातून सोडून देण्यात आले. हे ही वाचा : ऋषभ पंतवर मुंबईतील रुग्णालयात तीन तास सुरु होती शस्त्रक्रिया; जाणून घ्या पंतची Health update रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार संगकाराला थंडी, ताप, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह जाणवत होता. त्याच्या शरीरातील पाण्याची पातळीही कमी झाली होती. 103 पर्यंत ताप होता, म्हणून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे सांगितले. पुण्याच्या रुग्णालयात उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानताना संगकारा म्हणाला, रुग्णालयातील माझ्या वास्तव्यादरम्यान माझी काळजी घेणाऱ्या सर्व वैद्यकीय आणि इतर कर्मचाऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो. याव्यतिरिक्त, मी डॉ. देशमुख आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो, त्यांनी अत्यंत सक्षमपणे माझ्यावर उपचार केले. मी सुरक्षित हातात असल्याची खात्री मला वाटली. मी रूबी हॉल क्लिनिक येथील सर्वांच्या अविस्मरणीय आठवणी सोबत घेऊन जात आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा केल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे, अशा शब्दात संगकाराने सर्वांचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.