मुंबई, ७ जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत त्याच्या कार अपघातानंतर आता विविध आव्हानांशी मोठी झुंज देत आहे. पंतवर सध्या मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु असून आज तब्बल तीन तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर पंतच्या तब्बेती विषयी अपडेट येत असून या शस्त्रक्रियेनंतर पंत उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर ही शस्त्रक्रिया झाली असून पंतची ही शस्त्रक्रिया डॉ दिनशॉ पादरीवाला यांनी केली आहे. अपघातानंतर ऋषभ पंतवर देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु पायावरील शस्त्रक्रियेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी पंतला एअरलिफ्ट करून मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात हलवले. आज झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पंतला ३ ते ४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर पंत उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती आहे. हे ही वाचा : IND VS SL : तिसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघ पडणार श्रीलंकेवर भारी? असा आहे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवरील भारताचा रेकॉर्ड भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या गाडीला ३० डिसेंबर रोजी दिल्ली येथून रुडकी येथे जात असताना भीषण अपघात झाला होता. यावेळी ऋषभ पंत गाडीमध्ये एकटा होता आणि स्वतः गाडी चालवत होता. या अपघातात पंत सुदैवाने बचावला मात्र त्याला डोकं, पाय, हात आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातामुळे ऋषभ पंत पुढील काहीकाळ क्रिकेट जगतापासून दूर राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.