मुंबई, 20 मे : भारताची महिला बॉक्सर निखत झरीननं (Nikhat Zareen) वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा पराक्रम करणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सर आहे. 24 वर्षांच्या निखतनं थायलंडच्या जुटामास जितपोंगचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत गोल्ड मेडल पटकावले. निखतनं फायनल सहज जिंकली असली तरी तिचा इथपर्यंतचा प्रवास सहजासहजी झालेला नाही.
नातेवाईकांचा विरोध
निखतचा जन्म 14 जून 1996 रोजी निजामाबादमध्ये झाला. निखतचे चुलत भाऊ बॉक्सर आहेत. त्यामुळे तिला बॉक्सिंगसाठी प्रेरणा घरातूनच मिळाली. 2000 च्या दशकात हैदराबाद आणि निजामाबादमध्ये महिला बॉक्सर्सची संख्या कमी आहे. बॉक्सिंगमध्ये मुलींना ट्रेनिंगच्या वेळी शॉर्ट आणि टी शर्ट घालावा लागतो. त्यामुळे निखतला बॉक्सर होणे सोपे नव्हते. त्यावेळी तिला तिचे वडील मोहम्मद जलील आणि आई परवीन सुलताना यांनी भक्कम पाठिंबा दिला.
'निखतनं बॉक्सर होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आमच्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. पण कधी-कधी नातेवाईक आणि मित्र मुलींनी शॉर्ट ड्रेस घालावा लागेल असा खेळ खेळू नये असा सल्ला देत पण आम्ही नेहमीच निखतची बाजू घेतली. तिचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत केली आज ती वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे,' असं निखतचे वडील मोहम्मद जलील यांनी 'इंडियन एक्स्प्रेस' शी बोलताना सांगितले आहे.
IPL 2022 : विराट कोहलीनं दिली गुजरातच्या खेळाडूला धडक, सर्वांच्या चुकला काळजाचा ठोका! VIDEO
मेरी कोमशी वाद
निखतनं बॉक्सर होण्यासाठी नातेवाईंचा विरोध सहन केलाच. त्याचबरोबर तिचा भारताची सर्वात दिग्गज बॉक्सर मेरी कोमशी वाद झाला. भारतीय बॉक्सिंग फेडरेशननं टोक्यो ऑलिम्पिकसाठी 51 किलो वजनी गटातून अनुभवी बॉक्सर मेरी कोमची निवड केली. निखतला भविष्याचा विचार करून राखून ठेवण्यात आले आहे, असं तेव्हाचे बॉक्सिंग फेडरेशनचे संचालक राजेश भंडारी यांनी सांगितलं होतं. निखतनं या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला. तिनं थेट तत्कालिन क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहिले.
या वादानंतर मेरी कोमची ट्रायल घेण्यात आली. त्यावेळी तिचा सामना निखतशी झाला. दोन्ही खेळाडूंमधील वाद इतका विकोपाला गेला होता की त्या सामन्यात विजयानंतर मेरी कोमनं निखतशी हस्तांदोलनही केलं नाही. निखतनं टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी ही ट्रायलची मागणी केली होती त्यावेळी निखत झरीन कोण आहे? असा प्रश्न मेरी कोमनं पत्रकारांना विचारला होता. आता निखतनं वर्ल्ड चॅम्पियन होत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.