अहमदाबाद, 30 मे : आयपीएल फायनलमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर झालेल्या सामन्यात अखेरच्या दोन चेंडूवर रविंद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला. दहा धावा हव्या असताना त्याने एक षटकार आणि एक चौकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केलं. यासह गुजरातचे सलग दुसऱ्यांचा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने ऑरेंज कॅप पटकावली आहे. यंदाच्या हंगामात त्याने सर्वाधिक धावा केल्या. चेन्नई विरुद्ध त्याने अंतिम सामन्यात 20 चेंडूत 39 धावा केल्या. या खेळीसह त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 890 धावा केल्या. गिलने 17 सामन्यात या धावा केल्या. शुभमन गिलने यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅप पटकावली असली तरी त्याला विराट कोहलीचा विक्रम मोडता आलेला नाही. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक ९७३ धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने २०१६ मध्ये आरसीबीकडून खेळताना या धावा केल्या होत्या. विराट कोहलीनंतर एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. IPL 2023 : एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने पाचव्यांदा उंचावली IPL ट्रॉफी, Photos शुभमन गिल आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने २३ वर्षे २६३ दिवस वय असताना गिलने ही कामगिरी केलीय. गिलने ऋतुराज गायकवाडचा विक्रम मोडला. ऋतुराज गायकवाडने २४ वर्षे २५७ दिवस वय असताना ऑरेंज कॅप पटकावली होती. यंदाच्या हंगामात शुभमन गिलनंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिने सर्वाधिक धावा केल्या आहेत. डुप्लेसिने १४ सामन्यात ७३० धावा केल्या आहेत. एका हंगाममात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणाऱ्यांमध्ये गिल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने यंदाच्या हंगामात ८५ चौकार आणि ३३ षटकार मारले आहेत. या यादीत राजस्थानचा जोस बटलर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १२८ बाउंड्री मारल्या आहेत. तर विराट कोहली १२२ बाउंड्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नरने ११९ बाउंड्री मारल्या आहेत. शुभमन गिलने आयपीएलमध्ये एका हंगामात फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. याबाबतीत त्याने विराटला मागे टाकलंय. विराटने २०१६ मध्ये ही कामगिरी केली होती. गिलसाठी यंदाचं वर्ष जबरदस्त असं राहिलं आहे. त्याने आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने शतके झळकावली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.