लाहोर, 6 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असताना पाकिस्तान क्रिकेटला (Pakistan Cricket) मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी टीमचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक (Misbah Ul Haq) आणि बॉलिंग प्रशिक्षक वकार युनूस (Waqar Younis) यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पाकिस्तानची टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना मिसबाहला कोरोनाची लागण झाली, यानंतर त्याला तिकडेच क्वारंटाईन व्हावं लागलं. बायो-सिक्युर बबलच्या त्रासामुळे मिसबाह उल हकने राजीनामा दिल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.
'वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर मी मागच्या 24 महिन्यांमधली कामगिरी आणि पुढच्या आंतरराष्ट्रीय मॅचचं परिक्षण केलं. भविष्यातही कुटुंबाशिवाय बायो-सिक्युर बबलमध्ये राहावं लागणार आहे, त्यामुळे मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे,' असं मिसबाहने सांगितल्याचं प्रसिद्धी पत्रक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलं आहे.
'राजीनामा द्यायची ही वेळ कदाचित योग्य नसेल, पण सध्या मी प्रशिक्षक म्हणून राहण्याच्या मानसिक भूमिकेत नाही. मागच्या 24 महिन्यांमध्ये काम करायला मजा आली. मी टीम आणि मॅनेजमेंटने दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांचे आभार मानतो. तसंच भविष्यातल्या स्पर्धांबाबत त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यातही माझा पाठिंबा त्यांना असेल,' असं मिसबाह म्हणाला.
T20 World Cup 2021: पाकिस्तानची टीम जाहीर, 2 सुपर फ्लॉप खेळाडूंचा समावेश
मिसबाहने मला राजीनामा देत असल्याचं सांगितल्यानंतर मीदेखील राजीनामा दिला, कारण आम्ही दोघांनी एकाच वेळी जबाबदारी सांभाळली होती आणि जोडीने काम केलं होतं, अशी प्रतिक्रिया वकार युनूसने दिली.
सप्टेंबर 2019 साली या दोघांची पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती, यानंतर एक वर्ष बाकी असतानाच दोघांनी राजीनामा दिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी ऑफ स्पिनर शकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) आणि ऑलराऊंडर अब्दूल रझाक (Abdul Razzaq) यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. 11 सप्टेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.