दुबई, 12 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (Australia vs Pakistan Semi Final) पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने या स्पर्धेमधील इतर सामन्यांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवता आला नाही. असे असले तरी पाकिस्तानच्या एका खेळाडूने सर्वांचे मन जिंकले आहे. मैदानात उतरण्यापूर्वी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan ) आयसीयुमध्ये उपचार घेत होता. त्याचा आयसीयुमधील (ICU) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यानंतर फलंदाजीचा प्रशिक्षक मॅथ्यू हेडनने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
ऑस्ट्रेलिविरुद्ध पाकिस्तान या मॅचपूर्वी कोणालाच माहिती नव्हते की रिझवान गेले दोन दिवस रुग्णालयात उपचार घेत होता. मॅच झाल्यानंतर त्याचा रुग्णालयतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेमीफायनलपूर्वी, रिझवानला चेस्ट इन्फेक्शन म्हणजेच फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. मंगळवारी रिझवान आजारी पडल्यानंतर तो दोन दिवस दुबईमधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होता अशी माहिती समोर आली आहे. गंभीर बाब असली तरी देशासाठी रिझवान मैदानात उतरला. त्याची ही भूमिका पाहून जगभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाकिस्तान टीमचे डॉक्टर नजीब सोमरू यांनी याबाबत खुलासा केला आहे. 9 नोव्हेंबर रोजी रिझवानला चेस्ट इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवस तो आयसीयूमध्ये होता. त्याने फार वेगाने स्वत:ला सावरलं आणि सामन्याआधीच्या चाचण्यांमध्ये तो खेळण्यासाठी पात्र ठरला. देशासाठी खेळण्याची त्याची इच्छा आणि त्यासाठीची तयारी पाहून आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्याने आपल्या खेळातून तो उत्तम असल्याचं दाखवून दिले असे सोमरु यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रिझवानने 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. रिझवानच्या याच खेळीमुळे पाकिस्तानला 120 चेंडूंमध्ये 170 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडता आला. तसेच, त्याने यंदाच्या या स्पर्धेत 6 सामन्यात 70 च्या सरासरीने 281 धावा केल्या. या स्पर्धेत त्याने 3 अर्धशतकेही झळकावली.
इतकेच नव्हे तर एका वर्षात टी 20 स्पर्धेत 1000 धावा करण्याचा विक्रमही रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्वत:च्या नावे केला आहे.
शोएब अख्तरने रिझवानचा रुग्णालयामधील आयसीयू बेडवरील फोटो शेअर करत त्याचं कौतुक करत त्याला ‘हिरो’ म्हटलं आहे. “ही व्यक्ती स्वत:च्या देशासाठी आज खेळलीय आणि सर्वोत्तम कामगिरी केलीय याचा तुम्ही विचार तरी करु शकता का. मागील दोन दिवसांपासून तो रुग्णालयामध्ये होता. रिझवान तुझा फार अभिमान वाटतो,” असं अख्तरने फोटो शेअर करताना म्हटले आहे.
फलंदाजीचा प्रशिक्षक मॅथ्यू हेडननेही, “रिझवान हा योद्धा आहे. त्याच्यात फार हिंमत आहे,” असे म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup