मुंबई, 04 मार्च : भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलची तयारी करत आहे. त्याआधी आयसीसीने टी20 रँकिंग जाहीर केलं आहे. यामध्ये भारताची युवा खेळाडू शेफाली वर्मा हिनं पहिलं स्थान पटाकवून इतिहास घडवला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी आणि फक्त 18 टी20 सामने खेळत तिने दिग्गज महिला क्रिकेटपटूंना मागे टाकलं आहे.शेफाली वर्माने 761 गुणांसह वर्ल्ड टी20 रँकिंगमध्ये 19 स्थानांनी झेप घेतली आहे. तिनं न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकलं. आयसीसी टी20 रँकिंगमध्ये भारताच्या स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या क्रमवारीत 2 स्थानांनी घसरण झाली आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये लंकेविरुद्ध शेफालीनं 47 धावांची सर्वोत्तम खेळी केली. सलग दुसऱ्यांदा तिचं अर्धशतक हुकले होते. याआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही तिनं 46 धावा केल्या होत्या. वयाच्या 15 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळालेल्या शेफालीची फटकेबाजी पाहून दिग्गज क्रिकेटपटूंनीही कौतुक केलं होतं.
🚨 RANKINGS UPDATE 🚨
— ICC (@ICC) March 4, 2020
Youngsters at the top of the world! New No.1 on the @MRFWorldwide ICC Women's T20I Rankings following the #T20WorldCup group stage!
Batting ▶️ Shafali Verma 🇮🇳
Bowling ▶️ Sophie Ecclestone 🏴 pic.twitter.com/KU4pAjKIxr
खरं तर टीम इंडियाला अखेर दुसरा विरेंद्र सेहवाग मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंतच्या कारकीर्दीत 16 वर्षीय शेफाली वर्माने दिग्गज गोलंदाजांची झोप उडवली आहे. एकेकाळी क्रिकेटचा सराव करण्यासाठी शेफाली मुलगा बनून जायची. आता तिला क्रिकेटमध्ये लेडी सेहवाग असंही म्हटलं जातंय. तिला क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं ‘मुलगा’ शेफालीच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मुलींसाठी रोहतकमध्ये एकही अकॅडमी नव्हती. त्यावेळी तिला प्रवेश मिळावा म्हणून भिक मागितली तरीही कोणी ऐकलं नाही. शेवटी मुलीचे केस कापून तिला एका अकॅडमीत घेऊन गेलो आणि मुलाप्रमाणे प्रवेश घेतला. मुलांच्या संघातून खेळताना अनेकदा दुखापत झाली. तरीही न डगमगता तिने क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं. तिच्या वडिलांनी सांगितलं की, मुलांविरुद्ध खेळणं सोप्पं नव्हतं. अनेकदा चेंडू हेल्मेटवर लागायचा. पण शेफालीने धैर्यानं सामना केला. एखादी मुलगी मुलगा होऊन खेळते तेव्हा तिला कोणीच कसं ओळखलं नाही असं विचारल्यानंतर शेफालीच्या वडिलांनी सांगितलं की, मला भिती होती पण कोणीही तिला ओळखलं नाही. वयच असं होतं की मुलगा मुलगी कळत नव्हतं. भारतीय संघात निवड होईपर्यंत शेफालीचा प्रवास सहज नव्हता. या काळात अनेक गोष्टींना तिला तोंड द्यावं लागलं. क्रिकेट अकॅडमीत प्रवेश तर मिळवला पण शेजारी आणि नातेवाईकांनी बोलायला सुरूवात केली. तुमची मुलगी मुलांसोबत खेळते. मुलींचे क्रिकेटमध्ये कोणतेही भविष्य नाही. त्यावेळीच शेफाली म्हणाली होती की, एक दिवस हेच लोग माझं कौतुक करतील असंही शेफालीच्या वडिलांनी सांगितलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आदर्श मानून 5 वर्षांपूर्वी शेफालीनं क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सचिन त्याचा शेवटचा रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हा त्याला खेळताना पाहून क्रिकेटमध्येच करिअर करायचं असं तिनं ठरवलं होतं. शेफाली सर्वात पहिल्यांदा 2018-19 मध्ये आंतरराज्य महिला टी20 स्पर्धेवेळी चर्चेत आली होती. यामध्ये तिनं नागालँडविरुद्ध 56 चेंडूत 128 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आयपीएलदरम्यान महिला टी20 चॅलेंजमध्ये तिनं आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध 31 चेंडूत 34 धावांची खेळी केली होती. VIDEO : कधी काळी मुलगा बनून खेळायची क्रिकेट! आता झाली ‘लेडी सेहवाग’