मुंबई, 27 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत काल महिला टी 20 वर्ल्ड कपचा पहिला सामना पारपडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून तब्बल सहाव्यांदा टी 20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. प्रथमच टी 20 वर्ल्ड कपची फायनल गाठलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी पराभूत केले. परंतु यादरम्यान संघ पराभूत झाला असला तरी आफ्रिकेच्या महिला खेळाडूने मात्र इतिहास रचला. फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या होत्या. तर यासह त्यांनी आफ्रिकेला 157 धावांचे आव्हान दिले. पण हे आव्हान पूर्ण करण्यात आफ्रिकेचा महिला संघ अयशस्वी ठरला. परंतु उपविजेत्या संघाची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने मात्र सामन्यात दोन विकेट घेऊन इतिहास रचला. ती या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने आतापर्यंत महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 विकेट घेतल्या आहेत. तिने यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना देखील मागे टाकले आहे. शबनीमच्या खालोखाल इंग्लंडची गोलंदाज अन्या श्रबसोलेने 27 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी हिने 42 सामन्यांत 40 विकेट घेतल्या असून ती या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.