मुंबई, 24 मार्च : गेल्या 6 महिन्यांमधली टीम इंडियाची (Team India) कामगिरी ऐतिहासिक राहिली आहे. भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत टेस्ट क्रिकेटमध्ये पराभव केला. तर इंग्लंडविरुद्ध टेस्ट आणि टी-20 सीरिजमध्ये (India vs England) विजय मिळवले, मुख्य म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने नवोदित खेळाडूंना संधी दिली. ऑस्ट्रेलियात तर टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागल्यामुळे युवा खेळाडूंना मजबुरी म्हणूनच संधी द्यावी लागली, पण या तरुणांनी त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
नवोदित खेळाडूंनी केलेल्या अशी उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी त्यांना टीम इंडियातल्या स्पर्धेमुळे संधी मिळत नाहीये. सध्याची भारतीय क्रिकेटची परिस्थिती बघीतली तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन टीम खेळू शकतात.
सध्याच्या भारतीय टीममधून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणांमुळे तर मोहम्मद शमी (Mohammad Shami) दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यांच्याऐवजी संधी मिळालेल्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. तसंच आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) 4 विकेट घेतल्या. तर आपली पहिलीच वनडे खेळणाऱ्या कृणाल पांड्यानेही अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद शमी आणि बुमराहचं टीममध्ये आगमन झाल्यानंतर ठाकूर आणि प्रसिद्धला दुर्दैवाने बाहेर बसावं लागणार आहे.
दुसरीकडे देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हेदेखील भारतीय टीमचा दरवाजा ठोठावत आहेत. देवदत्त पडिक्कल आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB), सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) कर्नाटकचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. भारतीय टीममधून डच्चू मिळालेला पृथ्वी शॉ यानेदेखील विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमाला गवसणी घातली. विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक रन करण्याचा विक्रम पृथ्वी शॉच्या नावावर झाला.
अशी आहे दुसरी टीम इंडिया
देवदत्त पडिक्कल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, प्रसिद्ध कृष्णा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, Jasprit bumrah, Prithvi Shaw, Shardul Thakur, Sports, Team india, Vijay hazare trophy