Home /News /sport /

Saurav Ghosal: सचिनसारखीच सौरव घोषालची कहाणी... अखेर सहाव्या स्पर्धेत 'स्वप्नपूर्ती'

Saurav Ghosal: सचिनसारखीच सौरव घोषालची कहाणी... अखेर सहाव्या स्पर्धेत 'स्वप्नपूर्ती'

सौरव घोषाल

सौरव घोषाल

Saurav Ghosal: सचिन आणि सौरवच्या यशातली एक खास बाब म्हणजे सचिननंही तब्बल सहाव्या प्रयत्नात भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. सौरवनंही त्याच्या कारकीर्दीतल्या सहाव्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाला गवसणी घातली.

    बर्मिंगहॅम, 04 ऑगस्ट: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी रात्री इतिहास घडला. भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषालनं राष्ट्रकुलमध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक पटकावलं. कॉमनवेल्थ गेम्सच्या आजवरच्या इतिहासात भारताला स्क्वॉशमध्ये एकेरीत मिळालेलं हे पहिलंच पदक ठरलं. सौरव घोषालसाठीही हे पदक खास होतं. कारण त्यासाठी त्याला तब्बल २० वर्ष वाट पाहावी लागली होती. म्हणूनच बर्मिंगहॅमच्या कॉमनवेल्थ स्क्वॉश कोर्टमध्ये कांस्यपदकासाठीची लढत जिंकल्यानंतर सौरव चांगलाच भावूक झाला होता. सौरवनं या लढतीत सहा वेळचा वर्ल्ड चॅम्पियन ब्रिटनच्या जेम्स विल्सट्रोपवर मात केली. यावेळी प्रेक्षकांमध्ये त्याची आई आणि पत्नीही उपस्थित होती. 2018 साली गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सौरवनं मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकावलं होतं. पण राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक पदकानं त्याला नेहमीच हुलकावणी दिली. 1998 साली स्क्वॉशचा राष्ट्रकुलमध्ये समावेश झाला. पण स्क्वॉशच्या वैयक्तिक प्रकारात पदकासाठी भारताला तब्बल 24 वर्ष वाट बघावी लागली. 35 वर्षांच्या सौरव घोषालसाठीही हे पदक अनेक अर्थांनी खास ठरलं. सौरव पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला ते वर्ष होतं 2002. मॅन्चेस्टर कॉमनवेल्थ गेम्स. पण मॅन्चेस्टर, मग 2006 साली दोहा, 2010 साली दिल्ली, 2014 साली ग्लासगो आणि 2018 च्या गोल्ड कोस्टमधल्या स्पर्धेतही पुरुष एकेरीत तो अपयशी ठरला. अखेर बर्मिंगहॅममध्ये सौरवचं ते स्वप्न साकार झालं. क्रिकेटमध्येही 2011 साली भारतानं विश्वचषक जिंकला. त्यासाठी सचिनलाही तब्बल दोन दशकं वाट पाहावी लागली होती. हेही वाचा - CWG 2022: ‘स्विंग’ची राणी… भारताच्या रेणुका सिंगचा खतरनाक इनस्विंग, व्हिडीओ व्हायरल कांस्यपदक आजोबा आणि प्रशिक्षकांना समर्पित सौरव घोषालनं राष्ट्रकुलचं विक्रमी पदक आपल्या आजोबांना आणि दिवंगत माजी प्रशिक्षक माल्कम विलस्ट्रॉप यांना समर्पित केलंय. महत्वाची बाब म्हणजे कांस्यपदकासाठीच्या लढतीत सौरवनं ज्या जेम्स विलस्ट्रॉपवर मात केली तो माल्कम विलस्ट्रॉप यांचाच लेक. जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ सौरवनं माल्कम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडमधील त्यांच्या स्क्वॉश कोर्टमध्ये सराव केला. मास्टर ब्लास्टरकडून कौतुक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही काल ट्विट करत सौरवसह इतर पदकविजेत्यांचं कौतुक केलं. सचिन आणि सौरवच्या यशातली एक खास बाब म्हणजे सचिननंही तब्बल सहाव्या प्रयत्नात भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. सौरवनंही त्याच्या कारकीर्दीतल्या सहाव्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाला गवसणी घातली.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Sachin tendulakar, Sports

    पुढील बातम्या