मुंबई, 07 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं सध्या सामान्य लोकांपासून ते सर्व सिलेब्रिटी, क्रिकेटर घरांमध्ये कैद आहेत. अशा काळात काही क्रिकेटर घर काम करत आहेत, तर काही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सध्या मुंबईतील आपल्या घरात कैद आहे. लॉकडाऊन निमित्त जशी सामन्य लोकांच्या घरात पंचपक्वाने बनतात, तशीच सचिनची लेक साराही त्याच्यासाठी करत आहेत. सारानं आपल्या लाडक्या बाबासाठी नुकतेच पोषक कबाब केले. सारानं सचिनला सरप्राइज देण्यासाठी बिटाचे कबाब तयार केले होते. आपल्या लाडक्या लेकीनं तयार केलेले हे कबाब सचिननं 60 सेकंदात फस्त केले. याचा फोटोही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केला. यातील पहिल्या फोटोमध्ये सारा आणि सचिन कबाबसह तर, दुसऱ्या फोटोमध्ये सचिन रिकाम्या डिशसह दिसत आहे.
दुसरीकडे करोनाविरुद्ध लढ्यात सचिनने आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे. सचिननं याआधी मुख्यमंत्री-पंतप्रधान सहायता निधीला मदत केली होती. तसेच, गरजू लोकांनाही त्यानं जिवनावश्यक वस्तू पुरवल्या होत्या. सचिननं दिले क्रिकेटमध्ये बदल होण्याचे संकेत कोरोनानंतर क्रिकेट सामने सुरू झाल्यासही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. याबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काही संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे क्रिकेटमधील बरेच बदल होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी त्याला थूंकी लावतात. खरतर चेंडू चमकवण्यासाठी ही ट्रीक वापरली जाते. मात्र कोरोनानंतर हे गोलंदाजांना महागात पडू शकते. याबाबत सचिन म्हणाला की, “कोरोनानंतर क्रिकेटमध्ये सर्व काही बदलेल यात शंका नाही. चेंडू चमकत नसेल तर तो कसा प्रतिसाद देईल हे कोणालाही ठाऊक नाही”. तसेच, सचिन म्हणाला की, “कोणत्याही संघाने चेंडूवर लाळ किंवा घामाचा वापर केल्याशिवाय कोणताही सामना खेळला आहे असे मला वाटत नाही. तथापि, खेळाडूंना अंतर ठेवण्याची जाणीव असेल आणि विकेट घेतल्यानंतरही त्यांना याची काळजी घ्यावी लागेल”. दरम्यान, क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर काही काळ ते बंद मैदानात म्हणजे प्रेक्षकांशिवाय होतील. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.