मुंबई, १५ जानेवारी : आज भारतात सर्वत्र मकर संक्रांतिचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घरारात गृहिणी तिळाचे लाडू साखर फुटाणे बनवत असून लहान मुलं आकाशात पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आपल्या कुटुंबाला खास सरप्राईज दिले आहे. सचिन तेंडुलकर प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन आपल्या इतर कामांसह कुटुंबाला देखील वेळ देताना पहायला मिळतो. अशातच आज मकर संक्रांतीचे अवचित्य साधून सचिनने आयुष्यात पहिल्यांदाच तिळगुळाचे लाडू स्वतःच्या हाताने तयार केले आहेत. त्याचा व्हिडीओ सचिनने आपल्या सोशल मीडियावर टाकला असून चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
सचिनने या व्हिडिओच्या सुरुवातीला तो तिळाचे लाडू बनवून आपल्या कुटुंबाला सरप्राईज देत असल्याचे सांगितले. सचिनने घरातील स्वयंपाक घरात तीळ, तूप, गूळ, शेंगदाणे इत्यादी साहित्यांचा वापर कडून स्वादिष्ट असे लाडू तयार केले. यानंतर त्याने आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतिच्या शुभेच्छा दिल्या.