मुंबई, 3 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या नावाखाली अनेक परदेशी सेलेब्रिटींनी आक्षेपार्ह हॅशटॅग Twitter वर ट्रेंड केले. वादग्रस्त आणि असत्य मजकूर पसरवून प्रक्षोभक प्रचार केल्याबद्दल कारवाईचा इशारा एकीकडे भारत सरकारने ट्विटरवर दिला असताना या सोशल मीडियाच्या अपप्रचाराला विरोध करायला भारतीय सेलेब्रिटी एकवटले आहेत. या हॅशटॅग लढ्यात आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सामील झाला आहे. बाहेरच्यांनी दुरूनच पाहावं, ढवळाढवळ करू नये, अशा अर्थाचं ट्वीट करत सचिनने विदेशी सेलेब्रिटींचे कान उपटले आहेत. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत. दिल्लीच्या वेशीवर सुरू असणाऱ्या या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक स्वरूप मिळालं. त्यावर आता कारवाई सुरू आहे. या सगळ्यावर पॉप गायिका रिहाना हिने प्रतिक्रिया दिली. अनेक विदेशी सेलिब्रिटींनी भारताविरोधात आगपाखड सुरू केली. शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळतो आहे. पॉर्न स्टार म्हणून ओळख असलेल्या मिया खलिफापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या. यानंतर आता भारतीय सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. कोणत्याही चुकीच्या प्रचाराला भारतीयांनी बळी पडू नये. भारतीयांनी एकजूट राहण्याची गरज आहे, असं ट्वीट अनेक सेलिब्रिटींनी केलं आहे. त्यात आता सचिन तेंडुलकरची भर पडली आहे.
#IndiaTogether : ‘आमच्यात फूट नको’, देशाच्या एकजुटीसाठी सरसावले भारतीय सेलिब्रिटी
‘भारताची एकात्मतेवर गदा कदापी सहन होणारी नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, पण अंतर्गत मामल्यात सामील होऊ नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या’, असं सचिनने लिहिलं आहे. #IndiaTogether
#IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅग सचिनने शेअर केले आहेत.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा जाहीर केल्यानंतर त्यांची कानउघाडणी करणारं एक निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of external affairs) प्रसिद्ध केलं. त्यावर भारतीय सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर, सुनील शेट्टी असे बरेच सेलिब्रिटी व्यक्त झाले आहेत.

)







