मुंबई, 31 मार्च : जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर सचिनला लवकर बरं वाटावं म्हणून जगभरातले त्याचे चाहते प्रार्थना करत आहे. सचिनचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानेही सचिनसाठी दुआ मागितली आहे. शोएबने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आहे. मागच्याच आठवड्यात सचिनने आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं, तसंच आपण स्वत:ला घरामध्येच क्वारंटाईन केलं आहे आणि घरातल्या इतरांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असं सांगितलं. काहीच दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिन इंडिया लिजंड्सचा कर्णधार होता. फायनलमध्ये इंडिया लिजंड्सने श्रीलंका लिजंड्सचा पराभव केला होता. या सीरिजमध्ये खेळलेले सचिनसह, युसुफ पठाण, इरफान पठाण आणि एस बद्रीनाथ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सचिनला कोरोना झाल्याचं समजल्यावर शोएब अख्तरने ट्वीट केलं. ‘मैदानातल्या माझ्या कट्टर प्रतिस्पर्ध्यापैकी एक, लवकर बरा हो मित्रा,’ असं शोएब म्हणाला. सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर यांच्यातलं द्वंद्व क्रिकेट रसिकांना आवडायचं. या दोघांना मैदानात एकमेकांविरुद्ध पाहणं चाहत्यांसाठी खास असायचं. सचिन तेंडुलकरने टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये अनुक्रमे 15,921 आणि 18,426 रन केल्या आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा आणि सर्वाधिक 100 शतकं करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. तर शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 444 विकेट घेतल्या. अख्तरने सचिनची वनडेमध्ये 5 वेळा तर टेस्टमध्ये 3 वेळा विकेट घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.