मुंबई, 13 फेब्रुवारी : भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असून याचे तरुणाईला भलतेच वेड आहे. अशातच सध्या स्थानिक पातळीवरील एका क्रिकेट सामन्याचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात फलंदाजाने टोलवलेला चेंडू मैदानात फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या खेळाडूने अजब पद्धतीने पकडला. या अनोख्या फिल्डिंग स्टाईलची भुरळ नेटकऱ्यांसोबतच आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील पडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ बेळगाव मधील व्हॅक्सिन डेपोवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील आहे. शहरातील टिळकवाडी येथे श्री स्पोर्ट्स तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान गोलंदाजाने टाकलेल्या वेगवान चेंडूवर फलंदाजाने जोरदार फटका मारला. हा चेंडू खरंतर सीमा रेषेबाहेर जात होता, परंतु फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या खेळाडूने चपळाई दाखवत तो षटकार वाचवला.
सीमारेषेच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या खेळाडूने चेंडू पकडला, परंतु आपण सीमारेषेच्या बाहेर जाणार हे लक्षात आल्यानंतर त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला. आश्चर्याची बाब म्हणजे फेकलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडणार हे लक्षात येताच क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या बाहेर येऊन कमाल केली आणि एखाद्या फुटबॉलर प्रमाणे चेंडू पायाने सीमारेषेच्या आतमध्ये मारला मग सहकारी खेळाडूने हा झेल पकडला. त्यामुळे फलंदाजाची विकेट घेण्यात यश आले.
Taking boundary catching to a whole new level...🏃♂️
— Omkar Mankame (@Oam_16) February 12, 2023
Via WhatsApp. pic.twitter.com/0r2Qcie3gX
स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमधला हा व्हिडीओ सचिन तेंडुलकरने देखील ट्विट करून त्यावर यावर प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, “जेव्हा तुम्ही एखादा माणूस आणता ज्याला फुटबॉल कसा खेळायचा हे देखील माहित असते तेव्हा असे घडते”. हे लिहून सचिनने काही हसणारे इमोजी देखील शेअर केले.