अहमदाबाद, 30 नोव्हेंबर: महाराष्ट्राचा कॅप्टन आणि धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडनं पुन्हा एकदा विजय हजारे करंडकात शतकी खेळी साकारली. गेल्या तीन दिवसातलं ऋतुराजचं हे दुसरं शतक ठरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऋतुराजनं असामविरुद्ध हे शतक ठोकलं. सेमी फायनलच्या या लढतीत असामनं टॉस जिंकून महाराष्ट्राला बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं. पण महाराष्ट्राच्या फलंदाजांसमोर असामचं आक्रमण कमकुवत ठरलं. गेल्या मॅचमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या ऋतुराजनं याही सामन्यात आपला सुपर फॉर्म कायम ठेवला. वर्ल्ड रेकॉर्डनंतर दुसरं शतक ऋतुराज गायकवाडनं दोन दिवसांपूर्वी झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या शिवा सिंगला एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्सर्स ठोकले होते. अशी कामगिरी करणारा ऋतुराज जगातला पहिलाच बॅट्समन ठरला. त्या मॅचमध्ये त्यानं नाबाद 220 धावांची खेळीही केली. त्यानंतर आज असामविरुद्ध पुन्हा एकदा ऋतुराजच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. त्यानं 126 बॉलमध्ये तब्बल 168 धावा फटकावल्या. त्यात 18 फोर आणि 6 सिक्सर्सचा समावेश होता. यंदाच्या विजय हजारे करंडकातलं ऋतुराजचं हे 4 सामन्यातलं तिसरं शतक ठरलं. तर याच स्पर्धेत गेल्या सीझनपासून आतापर्यंत 9 इनिंगमध्ये त्यानं 7 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा - Vijay Hajare Trophy: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स? ‘या’ खास अॅक्शनमुळे झाली होती चर्चा… महाराष्ट्राचा धावांचा डोंगर असामविरुद्धच्या या लढतीत महाराष्ट्रानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 50 ओव्हर्समध्ये 7 बाद 350 धावांचा डोंगर उभारला. ऋतुराजसह महाराष्ट्राच्या अंकित बावनेनंही शतक झळकावलं. त्यानं 110 धावांची खेळी केली. त्यामुळे महाराष्ट्राला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला.