मुंबई, 14 मार्च : अहमदाबाद येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना पारपडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ड्रॉ झाला पण भारताने 2-1 ने आघाडी मिळवत मालिका जिंकली. अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद शमी सोबत एक विचित्र घटना घडली, ज्यावरून मोठा वाद झाला होता. यावर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. अहमदाबाद येथील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ त्या दिवसाचा खेळ संपवून पुन्हा डग आउट मध्ये जात होता. अशातच स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी मोहम्मद शमीला पाहून ‘जय श्री राम’ चे नारे दिले. यावर शमीने हात जोडून हवेत उंचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा व्हिडिओ पोस्ट करून मोहम्मद शमी समोर ‘जय श्री राम’ चे नारे देणाऱ्या प्रेक्षकांविषयी टीका केली. त्यामुळे या घटनेवरून राजकारण देखील तापले होते. IND vs AUS Test : भारताविरुद्ध दमदार फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना विराट कोहलीकडून खास गिफ्ट
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माची पत्रकार परिषद पारपडली. या परिषदेत पत्रकारांनी मोहम्मद शमी सोबत घडलेल्या या घटने विषयी प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना रोहित शर्मा म्हणाला, “मोहम्मद शमीसमोर जय श्री रामचे नारे देण्यात आले याबाबत मला कल्पना नव्हती. याबद्दल मी प्रथमच ऐकत आहे. तिथे काय झाले ते मला माहीत नाही”, असे म्हणून रोहितने याला टाळण्याचा प्रयत्न केला.