इरफान पठाणने श्रीलंकन दिग्गजांच्या तोंडचा घास पळवला, इंडिया लिजंड्सचा दणदणीत विजय

इरफान पठाणने श्रीलंकन दिग्गजांच्या तोंडचा घास पळवला, इंडिया लिजंड्सचा दणदणीत विजय

भारताचे दिग्गज फलंदाज सचिन, सेहवाग, युवराज बाद झाल्यानंतर इंडिया लिजंड्सची अवस्था 3 बाद 19 अशी झाली होती. त्यानंतर मोहम्मद कैफ आणि इरफान पठाणने संघाला विजय मिळवून दिला.

  • Share this:

मुंबई, 11 मार्च : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्सने श्रीलंका लिजंड्सविरुद्धचा सामना 5 विकेटने जिंकला. या सामन्यात सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकांत इरफान पठाणने केलेल्या फटकेबाजीमुळे इंडिया लिजंड्सला सामना जिंकता आला. त्याने फक्त 31 चेंडूत 57 धावांची तुफान फटकेबाजी केली.  लंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीला लंकेनं लवकर बाद केलं. यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला. चामिंडा वासच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कलुविथरानाकडे झेल देऊन बाद झाला.

सचिन बाद झाल्यानंतर सेहवागही धावबाद झाला. गेल्या सामन्यात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या सेहवागने 5 चेंडूत फक्त 3 धावा केल्या. त्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंग चामिंडा वासच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 4.2 षटकांत भारताची अवस्था 3 बाद 19 अशी झाली होती.

युवराज बाद झाल्यानंतर संजय बांगर आणि मोहम्मद कैफ यांनी डाव सावरला. संजय बांगर रंगना हेराथच्या गोलंदाजीवर पायचित झाला. तर कैफला सेनानायकेनं 46 धावांवर बाद केलं. त्यानंतर इरफान पठाणने तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. त्याला मनप्रीत गोनीने दुसऱ्या बाजुने साथ दिली. कैफ बाद झाला तेव्हा इंडिया लिजंड्सच्या 5 बाद 81 धावा झाल्या होत्या. त्यानंतर इरफान पठाणने 31 चेंडूत 57 धावा केल्या आणि इंंडिया लिजंड्सला दणदणीत विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या. लकेंकडून दिलशान, कलुविथराना, कपुदगेरा आणि सेनानायके यांनाच 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या. भारताच्या मुनाफ पटेलनं 4 गडी बाद केले तर झहीर खान, इरफान पठान, गोनी आणि संजय बांगर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हे वाचा : INDL vs SLL : मुंबईकर हैराण, मास्टर ब्लास्टर सचिन शून्यावर बाद

याआधी इंडियन लिजंड्सने पहिल्या सामन्यात विंडीजविरुद्ध 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यात भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी 83 धावांची भागिदारी केल्यानं इंडिया लिंजंड्सने 3 गड्यांच्या मोबदल्यात विंडिजने दिलेलं आव्हान पूर्ण केलं होतं.

हे वाचा : पाकिस्तानची जर्सी पण नाव आणि नंबर धोनीचा, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

First published: March 10, 2020, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading