मुंबई, 20 फेब्रुवारी : दुखापतीनंतर पुनरागमन करताना रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने दोन कसोटीत १७ विकेट घेतल्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या दोन्ही सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे जडेजाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता जडेजाची नजर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर असणार आहे. सचिन तेंडुलकरने भारताकडून २०० कसोटी सामने खेळले असून यात १४ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. तर जडेजाने फक्त ६२ कसोटी सामन्यात ९ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलाय. जडेजा सध्या ज्या फॉर्ममध्ये दिसतोय ते पाहता तो लवकरच सचिनचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. हेही वाचा : IND Vs AUS : दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अचनाक परतला मायदेशी सचिन तेंडुलकरशिवाय राहुल द्रविडचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने भारतासाठी १६३ कसोटी सामने खेळताना ११ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अनिल कुंबळेने १३२ कसोटीत १० वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामनावीर पुरस्कार पटकावताच अश्विन आणि विराट कहोलीला मागे टाकलंय. दोघांनीही ९ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. मात्र सामन्यांच्या तुलनेत जडेजाने कमी सामन्यात ही कामगिरी केलीय.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ११५ धावांचे आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात ७ तर अश्विनने ३ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा संघ २६३ धावाच करू शकला होता. तर भारताला संघ २६२ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यानतंर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव फक्त ११३ धावात संपुष्टात आला.