दिल्ली, 20 फेब्रुवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सगल दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. दोन्ही कसोटी सामने तिसऱ्या दिवशी संपले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या अडचणी कमी होत नसल्याचंच दिसतंय भारताविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पुनरागमन करण्यासाठी दोन्ही सामन्यात विजय मिळवणं ऑस्ट्रेलियासाठी गरजेचं आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे. कमिन्स अचनाक घरी परतल्याचं कारण वैयक्तिक असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात पॅट कमिन्सची कामगिरी निराशा करणारी आहे. दोन सामन्यात त्याला ३९.६६ च्या सरासरीने फक्त तीनच विकेट घेता आल्या आहेत. जर कमिन्स तिसऱ्या कसोटीआधी परतला नाही तर उपकर्णधार स्टिव्ह स्मिथ नेतृत्व करू शकतो. २०१८ मध्ये झालेल्या सँडपेपर गेट प्रकरणाआधीपर्यंत स्मिथ कर्णधार होता. हेही वाचा : अखेरच्या दोन कसोटीसाठी संघ तोच, पण केएल राहुलबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय दोन वर्षांपूर्वी एडलेड कसोटीत भारतीय संघ फक्त ३६ धावांत गुंडाळला होता. त्यानतंर मेलबर्न कसोटीत भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं होतं. त्याचप्रमाणे भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून पुनरागमनाची अपेक्षा केली जात होती. मात्र दिल्ली कसोटीत दुसरा डाव गडगडला. नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ९१ धावा करू शकला होता. त्यानतंर पुन्हा दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करता आलं नाही. भारतीय फिरकीविरोधात रिव्हर्स आणि स्वीप मारण्याच्या नादात फलंदाज बाद होत गेले. रविवारी दुसऱ्या डावात १ बाद ६१ धावांवरून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव ११३ धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अखेरच्या ९ विकेट फक्त ४८ धावात गमावल्या. भारताने गेल्या ३६ वर्षांपासून दिल्ली कसोटीत पराभव न पत्करण्याचा विक्रम कायम ठेवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.