मुंबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक (Team India Coach) रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि इतर कोचिंग स्टाफचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun), बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikram Rathod) आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sreedhar) यांचा समावेश आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य कोच होईल, असं बोललं जातंय. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि जय शाह (Jay Shah) यांनी द्रविडला या पदासाठी तयार केल्याचं वृत्त आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याच्या दिशेने आता पावलंही पडायला सुरुवात झाली आहे. राहुल द्रविडचा सगळ्यात विश्वासू सहकारी पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांनी बॉलिंग प्रशिक्षकासाठी अर्ज केला आहे. पारस म्हांब्रे एका दशकापासून एनसीएमध्ये आहे. पारस म्हांब्रे यांनी बॉलिंग कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे (BCCI) अर्ज दिल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. ‘पारसने या पदासाठी अर्ज केला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर आहे. पारसकडे बराच अनुभव आहे आणि मागच्या एका दशकापासून तो भारताच्या युवा खेळाडूंना कोचिंग देत आहे,’ असं बीसीसीआय अधिकारी म्हणाला. कोण आहेत पारस म्हांब्रे? 48 वर्षांचे पारस म्हांब्रे मागच्या 18 वर्षांपासून भारतात क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण देत आहेत. 2015-16 साली राहुल द्रविड इंडिया ए आणि भारताच्या अंडर-19 टीमचा (Under 19 Team India) प्रशिक्षक होता, तेव्हा त्याने पारस म्हांब्रेंना बॉलिंग प्रशिक्षक होण्याची ऑफर दिली. पारस म्हांब्रे यांनीही द्रविडची ऑफर स्वीकारली. पुढे म्हांब्रे कोच असताना भारताने तीन वेळा अंडर-19 वर्ल्ड कपची फायनल गाठली, तर 2018 साली विजय मिळवला. पारस म्हांब्रे सध्या अंडर-19 टीमचे प्रशिक्षक असून इंडिया-एच्या यंत्रणेमध्येही ते महत्त्वाची भूमिका बजावतात. पारस म्हांब्रे यांनी 1996 साली इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. याच दौऱ्यात सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि वेंकटेश प्रसाद यांनीही त्यांची पहिलीच टेस्ट खेळली होती. या दौऱ्यातल्या इतर तिघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवलं, पण पारस म्हांब्रेंना मात्र प्रभाव पाडता आला नाही. इंग्लंड दौऱ्यामध्ये म्हांब्रे यांनी 2 टेस्ट आणि 2 वनडे खेळल्या, यानंतर त्यांना अखेरची संधी 1998 साली बांगलादेशविरुद्धच्या एका वनडेमध्ये मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हांब्रेंना फार यश मिळालं नसलं, तरी त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये मात्र धमाकेदार कामगिरी केली. 1993-94 च्या मोसमात पारस म्हांब्रे यांनी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मोसमात त्यांनी 23.77 च्या सरासरीने 30 विकेट घेतल्या. यानंतर लगेचच पुढच्या मोसमात त्यांची इंडिया-ए मध्ये निवड करण्यात आली. म्हांब्रेंनी रणजी ट्रॉफीमध्ये 24.36 च्या सरासरीने 284 विकेट घेतल्या. तसंच ते खालच्या क्रमांकावर उपयुक्त बॅटिंगही करायचे. म्हांब्रे टीममध्ये असताना मुंबईने पाचवेळा रणजी ट्रॉफी जिंकली. 2002-03 साली आपल्या नेतृत्वात मुंबईला विजय मिळवून दिला आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर म्हांब्रे यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये लेव्हल-3 चा कोचिंग डिप्लोमा केला. यानंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी दोन मोसम प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतली. दोन मोसम बंगालचे प्रशिक्षक असताना त्यांनी दोन्ही वेळा टीमला फायनलमध्ये पोहोचवलं. सप्टेंबर 2007 साली पारस म्हांब्रे यांची पहिल्यांदाच इंडिया ए चे प्रशिक्षक म्हणून निवड झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







