मुंबई, 8 जानेवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पूर्वी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू एरॉन फिंच याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशातच आता पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर कामरान अकमल याने देखील क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. परंतु निवृत्तीनंतर अकमलवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून कामरान अकमल याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी पाकिस्तान संघात स्थान देण्यात येत नव्हते. अशातच पाकिस्तान सुपर लीग फ्रँचायझी पेशावर जल्मीने या स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी कामरान अकमलला वगळले आहे. तेव्हा मीडियाशी बोलताना अकमलने आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची माहिती दिली.
हे ही वाचा : कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक
कामरान अकमल म्हणाला, 'पीसीबीमधील नवीन भूमिकांमुळे मी आता क्रिकेट खेळू शकणार नाही, हे निश्चित आहे. जेव्हा तुम्ही कोचिंगमध्ये प्रवेश करता किंवा राष्ट्रीय निवडकर्ता बनता तेव्हा तुम्ही खेळण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही असे मला वाटते'. अकमलचा पाकिस्तान क्रिकेटच्या राष्ट्रीय निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 41 वर्षीय कामरान अकमल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असतानाच आपण पीसीबीने दिलेल्या जबाबदारीतून वेळ मिळाल्यास छोट्या लीगमध्ये खेळण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.
कामरान अकमलची कारकीर्द :
कामरान अकमलने दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. अकमलने 53 कसोटीत 6 शतके आणि 12 अर्धशतकांच्या मदतीने 2648 धावा केल्या. दुसरीकडे, कामरान अकमलने 157 वनडे सामन्यांमध्ये 5 शतके आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने 3236 धावा केल्या आहेत. अकमलने 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाच अर्धशतकांच्या मदतीने 987 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.