मुंबई, 11 एप्रिल : भारतामध्ये या वर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम येणार आहे. पण पाकिस्तानी टीम भारतातल्या फक्त दोन शहरांमध्येच मॅच खेळण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या टीमला मागच्या भारत दौऱ्यात या दोन शहरांमध्ये सुरक्षित वाटलं होतं. पाकिस्तानची टीम चेन्नई आणि कोलकात्यामध्ये त्यांच्या बहुतेक मॅच खेळणार आहे. भारतामधल्या या वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या एकूण 46 मॅच 12 शहरांमध्ये होणार आहेत, ज्यात अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, राजकोट, बँगलोर, दिल्ली, इंदूर, गुवाहाटी आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे, पण अजूनही हा संवदेनशील विषय आहे. बीसीसीआय आणि भारत सरकार याबाबत काय निर्णय घेतं, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असं आयसीसीच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं. पाकिस्तानची टीम त्यांच्या जास्तीत जास्त मॅच कोलकाता आणि चेन्नईमध्ये खेळणं पसंत करेल. 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम कोलकात्यामध्ये मिळालेल्या सुरक्षेबद्दल समाधानी होती. तर चेन्नई पाकिस्तानसाठी खास जागा आहे. चेन्नईमध्येच पाकिस्तानने भारताविरुद्ध ऐतिहासिक टेस्ट विजय मिळवला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता 1 लाख 32 हजार प्रेक्षकांची आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचं आयोजन या मैदानात करणं आयसीसीसाठी फायद्याचा सौदा ठरेल, पण या स्टेडियममध्ये वर्ल्ड कप फायनल होणार आहे, त्यामुळे भारत-पाकिस्तान मॅचचं आयोजन दुसऱ्या शहरामध्ये केलं जाऊ शकतं. आयसीसीची कार्यक्रम समिती काही महिने बीसीसीआयसोबत बसून वर्ल्ड कपचा कार्यक्रम तयार करेल. पाकिस्तान त्यांच्या वर्ल्ड कपच्या मॅच बांगलादेशमध्ये खेळेल, असं आयसीसीचे महाप्रबंधक वसीम खान म्हणाले होते, पण पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.