मुंबई, 20 ऑगस्ट : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ब्रायन लारा (Brian Lara) हे असे दोन महान बॅट्समन आहेत, जे क्रीजवर येताच दिग्गज बॉलरनाही घाम फुटायचा. सचिन आणि लारा यांनी त्यांच्या करियरमध्ये अशा अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला. मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने मात्र आपल्याला या दोन खेळाडूंची भीती वाटायची नाही, असा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला आहे. मला सचिनची भीती वाटली नाही, पण मी वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) घाबरायचो, असं मुरली म्हणाला. हे सांगताना त्याने याचं कारणही सांगितलं. मुरलीधरन इएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना म्हणाला, ‘ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवाग माझ्याविरुद्ध चांगले खेळले. त्यांनी मी कोणता बॉल टाकतोय हे कळायचं. सचिनही माझ्या बॉलिंगवर चांगला खेळायचा, पण त्याने सेहवागसारखं माझ्या बॉलिंगवर आक्रमण केलं नाही. मला सेहवागची भीती वाटायची.’ ‘सचिनला बॉलिंग करताना भीती वाटली नाही, कारण तो माझ्यावर सेहवागसारखं आक्रमण करणार नाही, हे मला माहिती होतं. सेहवाग माझ्या बॉलिंगवर खूप रन काढू शकतो, हेदेखील मी जाणून होतो. सचिन फार रन काढायचा नाही, पण त्याची विकेट घेणं कठीण होतं. सेहवागला टेस्टच्या सुरुवातीच्या 2 तासांमध्येच 150 रन करण्याची इच्छा असायची, त्यामुळे मी सेहवागसमोर बचावात्मक फिल्डिंग लावली. तो मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करेल आणि आऊट करण्याची संधी मिळेल, हे मी जाणून होतो,’ अशी प्रतिक्रिया मुरलीधरनने दिली. वीरेंद्र सेहवागने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं केली आहेत. हा विक्रम करणारा तो एकमेव भारतीय आहे. सेहवागचं आणखी एक त्रिशतक केवळ 7 रनने हुकलं होतं. सेहवागने भारताकडून 104 टेस्टमध्ये 49.3 च्या सरासरीने 8,586 रन केले, यामध्ये 23 शतकांचा समावेश होता. याशिवाय त्याच्या नावावर वनडेमध्येही 15 शतकं होती. श्रीलंकेविरुद्ध त्याने 11 टेस्टमध्ये 72.88 च्या सरासरीने 1,239 रन केले, यात 5 शतकं आणि 3 अर्धशतकं होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.