मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसमुळे भारताल लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय जगभरातही अनेक देशांनी हे पाऊल उचललं आहे. यामुळे सर्वच ठप्प झाले आहे. क्रीडा विश्वात जर ठरल्याप्रमाणे स्पर्धा झाल्या असत्या तर आयपीएलचा उद्घाटनाचा सामना आज रंगला असता. मात्र जगातील सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित आणि रद्द कऱण्यात आल्या आहेत. आयपीएलमध्ये पहिला सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार होता. या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्यापेक्षा सर्वांच लक्ष होतं ते धोनी पुन्हा मैदानात दिसणार होता. पण कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आलं आणि चाहत्यांना धोनीला क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, याचा परिणाम धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर होण्याची दाट शक्यता आहे.
आय़पीएल न झाल्यास यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळण्याची शक्यता कमी आहे. याबाबत प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, धोनीची वेळ संपली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये तो खेळणं शक्य नाही. धोनीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जुलै 2019 मध्ये खेळला होता.
वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये धोनी धावबाद होताच भारताच्या विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. हर्षा भोगलेंनी सांगितलं की, मला नाही वाटत धोनी यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकेल. धोनी आयपीएलमध्ये चांगला खेळेल पण तेवढं पुरेसं नाही. त्यापेक्षा अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात.
याआधी भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर आणि फलंदाज विरेंद्र सेहवागनेसुद्धा धोनीला कमबॅक करणं कठीण असेल असं म्हटलं होतं. गावस्कर म्हणाले होते की, धोनीला वर्ल्ड कपमध्ये खेळताना बघायला आवडेल पण ते शक्य नाही होणार. आता संघ पुढे गेला आहे. धोनी कोणती मोठी घोषणा करणार नाही यासाठी त्यानं क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा सल्लाही गावस्कर यांनी दिला होता.
हे वाचा : धोनीला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'DSP' आता कोरोना वॉरियर्स, ICCनही केलं कौतुक
आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्या आता 15 एप्रिलपासून होतील का याबाबत शंका आहे. स्पर्धा जुलै महिन्यात घ्यावी यावरही चर्चा होऊ शकते. दरम्यान, जर ऑलिम्पिक सारखी स्पर्धा वर्षभर पुढे जात असेल तर आय़पीएल खेळवण्याची घाई कशासाठी? तेसुद्धा अशा धोकादायक परिस्थितीत असे प्रश्नही उपस्थित होतात. त्यामुळं आय़पीएल झाले नाही तर धोनी टी20 वर्ल्ड कपमध्ये दिसण्याची शक्यता जवळपास नाही. अशा परिस्थितीत धोनीपुढे निवृत्ती जाहीर कऱणं हाच पर्याय असेल असंही म्हटलं जात आहे.
हे वाचा : कोरोनामुळे मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची लागली वाट, करावं लागतंय घरकाम