नवी दिल्ली, 29 मार्च : संपूर्ण जग मिळून कोरोनाशी लढत आहे. कोरोनामुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन कऱण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यानंतर देशात कर्फ्यू लागू झाला आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असले तरी डॉक्टर आणि पोलिसांना बाहेर पडावे लागत आहे. यातल्याच एका भारतीय पोलिसाला आयसीसीने 2020 चा Real World Hero म्हटलं आहे. भारताला 2007 चा टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका त्या क्रिकेटपटूने पार पाडली होती. हा क्रिकेटपटू आता कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे.
2007मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये या क्रिकेटपटूने मॅच विनर खेळी केली होती. या क्रिकेटपटूचे नाव आहे जोगिंदर शर्मा. भारताला टी 20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा जोगिंदर शर्मा लोकांना या साथीच्या आजारापासून वाचविण्यात मदत करत आहे. त्याच्या या अभिमानास्पद कामाचा गौरव करताना आयसीसीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये जोगिंदर शर्माचा 2007 च्या वर्ल्ड कपमधील एक फोटो आणि सध्या रस्त्यावर पोलिसाच्या वर्दीत असलेला फोटो सोबत शेअर केला आहे.
हरियाणा पोलिसात जोगिंदर शर्मा (वय 36) डीएसपी आहे आणि तो सध्या आपले कर्तव्य बजावत आहे. लॉकडाऊन असूनही जोगिंदर शर्मा रस्त्यावर लोकांना जागृत करत आहेत. घरी राहणे योग्य असल्याचा संदेशही त्याने लोकांना दिला आहे. जोगिंदरने आपले खाकी वर्दीतले फोटो शेअर करत,'कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे एकमेव मार्ग आहे. घरात थांबा, सुरक्षित राहा. कृपया आम्हाला सहकार्य करा. जय हिंद', असा संदेश दिला.
हे वाचा : कोरोनामुळे मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची लागली वाट, करावं लागतंय घरकाम
2007मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहचला होता. यावेळी भारताचा सामना पाक संघाशी होता. अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या षटकात जोगिंदर शर्माने मिसबाह-उल-हकची विकेट घेऊन भारताला जेतेपद मिळवून दिले होते. मात्र हाच सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ऑरला. या स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन विकेट बाद केले. आंतरराष्ट्रीय टी -20 कारकीर्दीत त्याने 4 सामन्यांत 4 विकेट घेतल्या. टी -20 विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिसात दाखल झाला.
हे वाचा : पोलीस कर्मचाऱ्यांसाठी इरफान पठाणने केली 'ही' मागणी, VIDEO VIRAL