अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेडियमचं नाव मोटेरा स्टेडियम (Motera Cricket Stadium) होतं. ते बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) हे नवं नाव असेल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी नव्या नावाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील उपस्थित होते. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच याच मैदानावर खेळवली जाणार आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात याच स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक संयुक्त कार्यक्रम झाला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्टपासून हे स्टेडियम सुरू होईल. ही डे-नाईट टेस्ट आहे. भारतामध्ये होणारी ही दुसरीच डे-नाईट टेस्ट असून यापूर्वीची डे-नाईट टेस्ट कोलकातामध्ये झाली होती. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी आणि अंतिम टेस्ट मॅच देखील याच मैदानात होणार आहे. तसंच त्यानंतर पाच टी-२० मॅचची सीरिज देखील याच ठिकाणी होणार आहे. ( वाचा : IND vs ENG : अहमदाबादमध्ये गोंधळला टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू, तासाभरानंतर समजला प्रकार ) नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही तब्बल 1 लाख 10 हजार इतकी आहे.