नवी दिल्ली, 27 मार्च: आयसीसी महिला विश्वचषक 2022 मध्ये(INDvsSA WWC 2022) भारताने ‘करा किंवा मरो’ सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून स्मृती मानधना (71), शेफाली वर्मा (53) आणि मिताली राज (68) यांनी अर्धशतके झळकावली, तर हरमनप्रीत कौरने 48 धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून इस्माईल आणि क्लासने 2-2 बळी घेतले. मिताली राजने 68 धावांच्या या शानदार खेळीसह महिला विश्वचषकात आणखी एक विक्रम केला आहे. मिताली राज महिला वर्ल्ड कप मध्ये 50 धावा करणारी सर्वात तरुण आणि वयस्कर भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मितलीचे हे वर्ल्ड कप रेकॉर्ड मोडणे खूप कठीण आहे.
Youngest Indian to score 50 in WC - Mithali Raj
— BCCI Women (@BCCIWomen) March 27, 2022
Oldest Indian to score 50 in WC - Mithali Raj
Pure class, quality and longevity. Well done, skip @M_Raj03 🙌🏾🙌🏾 pic.twitter.com/4HbpjPm12P
तसेच, मिताली राज आता महिला विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मितालीच्या नावावर आता महिला विश्वचषकात 1321 धावा झाल्या आहेत, ती न्यूझीलंडच्या डेबी हॉकलीच्या मागे आहे, तिच्या नावावर विश्वचषकात 1501 धावा आहेत. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या 28 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. क्राइस्टचर्चच्या हेगली ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मिताली राजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या असताना त्याचा हा निर्णय योग्य ठरला. सलामीवीर शफाली वर्मा, स्मृती मानधना, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी भारताला या धावसंख्येत महत्त्वाची भूमिका बजावली.