पुणे, 26 डिसेंबर : रणजी ट्रॉफीमध्ये एका बाजुला फलंदाजांची हाराकीरी बघायला मिळत असतानाच धोनीच्या एका शिष्याने कमाल केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये छत्तीसगढविरुद्ध रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी केली. पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर फलंदाजीला प्रतिकूल अशा खेळपट्टीवर ऋतुराजने शकत साजरं केलं. त्याने 199 चेंडूत 108 धावा केल्या. यामध्ये 14 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या दिवशी 6 बाद 238 धावा केल्या. एमसीए स्टेडियमच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत होत होती. छत्तीसगडच्या वीर प्रताप सिंग आणि पुनीत दत्ते यांनी महाराष्ट्राच्या तीन फलंदाजांना फक्त 47 धावांत तंबूत धाडलं होतं. यात केदार जाधवचाही समावेश होता. ही गळती रोखत ऋतुराज गायकवाडने एका बाजूने संयमी फलंदाजी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ऋतुराजचे हे तिसरे शतक आहे. एकदिवसीय आणि टी20 प्रकारातला खेळाडू असलेल्या ऋतुराजने प्रथम श्रेणीत केलेली ही कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. ऋतुराज गायकवाडला भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक धोनीचा शिष्य मानलं जात आहे. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. 2019 च्या आयपीएलमध्ये आंद्रे रसेल फलंदाजी करत असताना ऋतुराजने धोनीला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सल्ला दिला होता. त्याबद्दल धोनीने ऋतुराजचे कौतुकही केलं होतं. वाचा : भारताच्या दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, चाहत्यांना केलं ‘हे’ आवाहन ऋतुराजने इंडिया ए साठी खेळताना श्रीलंका आणि विंडिजविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने नाबाद 187, नाबाद 125, 94, 84, 74, 3, 85, 20 आणि 99 धावांची खेळी केली होती. यामद्ये त्याने 116 च्या स्ट्राइक रेटने 677 धावा केल्या होत्या. आतापर्यंत त्याने लिस्ट ए मध्ये 50 च्या सरासरीने 2345 धावा केल्या असून यात 6 शतकांचा समावेश आहेत. सध्याचा परफॉर्मन्स पाहता तेराव्या हंगामात धोनी त्याला चेन्नईकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. वाचा : 7 टी-20 आणि 3 वनडे, असे आहे टीम इंडियाचे जानेवारीतील वेळापत्रक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








