नवी दिल्ली, 14 जुलै : जिद्द आणि निर्धार असेल तर व्यक्ती असंख्य अडथळे पार करून ध्येय साध्य करू शकते, हे ज्योती याराजी हीनं सिद्ध करून दाखवलं आहे. ज्योतीनं गुरुवारी मुसळधार पावसात ओल्या ट्रॅकवर बँकॉकमधील आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं. ज्योतीच्या कामगिरीमुळे भारतानं तीन सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांसह आशियाई चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट केला. ‘इंडियन एक्सप्रेस’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 23 वर्षांची आहे ज्योती बँकॉक येथील हीटमध्ये ज्योतीनं 12.98 सेकंदाची वेळ नोंदवली. या पूर्वी, ज्योतीचे प्रशिक्षक जेम्स हिलियर यांनी नोंदवलेल्या वेळेनुसार तिची सर्वोत्तम कामगिरी 13.09 सेकंदाची होती. पहिलं स्थान मिळवण्यासाठी ही कामगिरी नक्कीच पुरेशी आहे. मात्र, तरीही अंतिम हीटपूर्वी ज्योती काहीशी अस्वस्थ दिसत होती. कारण, तिनं स्वत:साठी यापेक्षाही हाय लेव्हलचे स्टँडर्स सेट केलेले आहेत. 23 वर्षांची ज्योती ही भारतातील एकमेव महिला खेळाडू आहे जी एका वर्षात सहावेळा 13 सेकंदांपेक्षा कमी वेळात 100 मीटर अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. शर्यतीनंतर ज्योती म्हणाली, ‘मी खरोखरच चांगली तयारी केली होती. पण, पाऊस सुरू झाल्यानं अडचणी वाढल्या. सातव्या अडथळ्यानंतर मी थोडीशी घसरले आणि लय गमावली. त्यामुळे मला सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरी करता आली नाही. पण, मी पदक जिंकले याचा मला आनंद आहे आणि माझ्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मी आनंदी आहे.’ कधीपासून घेतेय प्रशिक्षण? 2021 पासून ज्योतीला प्रशिक्षण देत असलेले रिलायन्स फाउंडेशनमधील अॅथलेटिक्स संचालक, प्रशिक्षक हिलियर यांच्या मते, ही शर्यत एकदम क्लीन झाली नाही. पण, शेवटी ज्योती जिंकली हे महत्त्वाचं आहे. सातव्या अडथळ्यानंतर ती घसरली नसती तर तिच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चार ते पाच मीटर पुढे राहिली असती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, ज्योतीनं पहिल्यांदा 100 मीटर अडथळ्यांची शर्यत 13 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केली होती. अशी कामगिरी करणारी देशातील पहिली महिला खेळाडू ठरली होती. बँकॉकमधला पाऊस ज्योतीसाठी वरदान ठरला, असं प्रशिक्षक हिलियर यांना वाटलं. हवामानामुळे सरावावर परिणाम होणार नाही, याची प्रशिक्षक खात्री करतात. एप्रिलमध्ये कोझिकोडमध्ये पाऊस पडत असताना धावपटू अमलन बोरगोहेननं 200 मीटरचा विक्रम मोडला तेव्हा त्याने हिलरला सांगितलं होतं की, आपण पावसात सराव केल्यामुळेच विक्रम मोडता आला. “मी न्यू साउथ वेल्समध्ये लहानाचा मोठा झालो आहे जिथे सतत पाऊस पडतो. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा भारतात लोक सराव थांबवतात, हे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं होतं. मी मात्र हा पायंडा मोडायचं ठरवलं. मी स्वत: पावसात उभं राहून खेळाडूंना सराव करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी आम्ही सराव केला आणि म्हणूनच आज ज्योती जिंकली,” असं हिलियर म्हणाले. कुटुंबाची बिकट परिस्थिती मूळची आंध्र प्रदेशातील असलेल्या ज्योतीचा खेळाडू होण्याचा प्रवास फारच आव्हानात्मक होता. तिची आई हॉस्पिटल क्लिनर म्हणून काम करायची तर वडील सुरक्षा रक्षक आहेत. तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, विशाखापट्टणम येथील घरातून हैदराबाद येथील स्पोर्ट्स हॉस्टेलपर्यंतच्या बस प्रवासासाठी ज्युनिअर कोच एन. रमेश यांनी तिला पैसे देऊन मदत केली होती. वरिष्ठ धावपटू आणि रेल्वे कर्मचारी कर्नाटपू सोजन्या यांनीही तिला आर्थिक मदत केली. MS Dhoni : चाहत्याची लहानशी इच्छा, धोनीने केली पूर्ण; इमोशनल VIDEO VIRAL 2010 मध्ये 4 बाय 400 मीटर आशियाई इनडोअर चॅम्पियनशिप सुवर्ण विजेत्या संघाचा भाग असलेल्या सोजन्या सिकंदराबाद-लिंगमपल्ली या लोकल मार्गावर तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होत्या. लिंगमपल्लीजवळ असेलल्या स्टेडियमवर ज्योती सरावासाठी जात असे. सोजन्या तिच्या तिकीटाचे पैसे काउंटरवरील एका सहकाऱ्याकडे देऊन ठेवायच्या. नंतर ज्योती हे पैसे घेऊन जात असे. सोजन्या म्हणाल्या, “जेव्हा मी खेळत होते तेव्हा माझ्या स्पाइक्ससाठी माझे सीनिअर पैसे जमा करायचे. मला त्याचीच परतफेड करायची आहे. मी योग्य व्यक्तीला मदत केली याचा मला आनंद आहे.” संघर्षाच्या दिवसांवर मात करून ज्योती आता टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अॅथलीट झाली आहे. तिला रिलायन्स फाउंडेशनचाही पाठिंबा आहे. ज्योतीचे ज्युनिअर कोच रमेश यांच्यासाठी देखील हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांनी 2016 मध्ये तिला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वसतिगृहात दाखल केलं होतं. सुरुवातीच्या काळात ज्योतीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही तरीदेखील रमेश यांनी तिला पाठिंबा दिला. Asia Cup : रोहित शर्मा मोडणार 5 मोठे विक्रम, सचिन अन् शाहिद आफ्रिदीला टाकू शकतो मागे सध्या भारताचे मुख्य कनिष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षक असलेले रमेश म्हणाले, “ती उड्या मारण्यात चांगली होती आणि पटकन गोष्टी समजून घेऊ शकत होती. तिच्यात लढाऊ वृत्ती होती. या शिवाय, प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहण्याची अनोखी क्षमता तिच्याकडे होती. त्यामुळेच मी तिला पाठिंबा दिला. मीच तिच्यासाठी अडथळ्यांची शर्यत निवडली होती.” बँकॉकमध्ये सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी सुरू आहे. 2017मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अजय कुमार सरोजनं, बँकाकमध्ये पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत 3:41.51 सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकलं. ट्रिपल जंपर अब्दुल्ला अबूबकरनं आशियाई स्पर्धेच्या रन-अपमध्ये 16.92 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक मिळवलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये उंच उडीत पदक मिळवलेल्या तेजस्वीन शंकरनं (7,527 पॉइंट), आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डिकॅथलॉन स्पर्धेत भाग घेत, कांस्यपदक जिंकलं. धावपटू ऐश्वर्या मिश्रानंही 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.