मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली. या मोसमातल्या पहिल्या 8 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, त्यामुळे ते सुरूवातीलाच प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाले. मुंबई इंडियन्सच्या या खराब कामगिरीनंतर लिलावामध्ये त्यांनी बोली लावलेल्या खेळाडूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरवर (Jofra Archer) मुंबईने 8 कोटी रुपये खर्च केले. दुखापतीमुळे आर्चर या मोसमात खेळू शकणार नाही, हे माहिती असतानाही मुंबईने त्याच्यावर बोली लावली. आयपीएल 2023 साठी आर्चर उपलब्ध असेल, या विश्वासाने मुंबईने त्याच्यावर एवढे पैसे खर्च केले, पण मुंबईच्या या विश्वासाला पुन्हा एकदा तडा बसण्याची शक्यता आहे.
कंबरेच्या फ्रॅक्चरमुळे आर्चर इंग्लंडसाठी 2022 चा संपूर्ण मोसम खेळू शकणार नाही. मार्च 2021 साली इंग्लंडसाठी अखेरची मॅच खेळलेल्या आर्चरची कारकिर्द दुखापतींमुळे संकटात सापडली आहे. ऍशेसमधली खराब कामगिरी आणि दुखापतींच्या कारणामुळे इंग्लंडचे बरेच खेळाडू या आयपीएलमध्ये खेळले नाहीत. आता आर्चर 2022 साली क्रिकेट खेळणार नाही, तसंच 2023 साली भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे, त्यामुळे या महत्त्वाच्या स्पर्धेआधी इंग्लंड आर्चरचा फिटनेस बघता त्याला आयपीएल खेळण्याची परवानगी देते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मागच्या काही काळापासून कोपराच्या दुखापतीने त्रस्त असलेला आर्चर पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या टी-20 ब्लास्टमध्ये ससेक्सकडून खेळणार होता. गुरूवारी होणाऱ्या ग्लॅमोर्गनविरुद्धच्या मॅचआधी आर्चरने सराव सामना खेळण्याचीही तयारी केली होती, पण त्याला मैदानात उतरता आलं नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही आर्चर संपूर्ण वर्ष बाहेर झाल्याचं स्पष्ट केलं आहे. जोफ्रा आर्चरचं मैदानात कधी पुनरागमन होईल, यासाठी कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं.
We're all with you and we're all gutted for you, @JofraArcher 😔
— England Cricket (@englandcricket) May 19, 2022
27 वर्षांच्या आर्चरवर मागच्या 14 महिन्यांमध्ये तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातली एक शस्त्रक्रिया हातामध्ये घुसलेली काच काढण्यासाठी तर उरलेल्या दोन कोपरावर करण्यात आल्या.
कोपरावर झालेल्या पहिल्या शस्त्रक्रियेनंतर आर्चरने मैदानात पुनरागमन केलं होतं. त्याने टी-20 ब्लास्ट आणि रॉयल लंडन कपमध्ये ससेक्सकडून एक सराव सामना खेळला होता, पण यानंतर त्याला पुन्हा फ्रॅक्चर झालं, त्यामुळे डिसेंबर महिन्यात त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. इंग्लंडची टीम वेस्ट इंडिजला गेली तेव्हा रिहॅबसाठी आर्चर इंग्लंडच्या टीमसोबत बारबाडोसमध्ये होता.
फास्ट बॉलरना होत असलेल्या दुखापतींमुळे इंग्लंड बोर्ड आधीच चिंतेत आहे, त्यात आता आर्चरला झालेल्या आणखी एका दुखापतीमुळे बोर्डाच्या चिंतेत भर पडली आहे. सॅम करन, क्रिस वोक्स, ओली रॉबिनसन, मार्क वूड, ओली स्टोन, सकीब महमूद आणि मॅथ्यू फिशर या फास्ट बॉलर्सची दुखापतीमुळे मोसमाच्या पहिल्या टेस्टसाठी निवड झाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Jofra archer, Mumbai Indians