मुंबई, 15 एप्रिल : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विस्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर हे दोघे मागील काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्याने क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. अशातच आता बीसीसीआयने बुमराह आणि श्रेयसचे मेडिकल अपडेट जाहीर करून त्यांच्या कमबॅक बाबत चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरबाबत मेडिकल बुलेटिन जाहीर केले. यात त्यांनी दुखापतग्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांच्या तब्बेतीबाबत माहिती दिली. मागील वर्षापासून जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. काही महिने विश्रांती घेऊन तो लवकरच मैदानावर परतेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु विश्रांतीने त्याची दुखापत बरी होत नसल्याने महिना भरापूर्वी त्याच्या पाठीवर न्यूझीलंड येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.
या शस्त्रक्रियेनंतर बुमराहला सहा आठवडयांनी त्याचे पुनर्वसन सुरू करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार बुमराहने शुक्रवारपासून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे त्याचे पुनर्वसन व्यवस्थापन सुरू केले आहे अशी माहिती शनिवारी बीसीसीआयने पत्रक काढून दिली. तसेच श्रेयस अय्यरच्या पाठीची दुखापत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामान्या दरम्यान बळावली होती. त्यामुळे श्रेयसच्या पाठीच्या खालच्या भागावर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यरला दोन आठवडे देखरेखीखाली ठेवले जाणार असून त्यानंतर काही आठवडयांनी तो पुनर्वसनासाठी NCA मध्ये परतणार आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) April 15, 2023
Medical Update: Jasprit Bumrah and Shreyas Iyer
Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/LKYAQi5SIn
बीसीसीआयच्या सूत्रांनी यापूर्वीच माहिती दिली होती की, बुमराह आणि श्रेयस हे दोघे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत फिट होऊ शकतात. आता बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केलेल्या मेडिकल अपडेटनुसार वनडे वर्ल्ड कपपर्यंत श्रेयस आणि बुमराहची भारतीय संघात पुन्हा एंट्री होऊ शकते. यामुळे दोघांचे फॅन्स आता उत्साहित झाले आहेत.