मुंबई, 16 फेब्रुवारी : आयपीएल 2022 साठीचा लिलाव (IPL Auction 2022) बँगलोरमध्ये शनिवार आणि रविवारी झाला. या लिलावात मिस्टर आयपीएल म्हणून ओळख कमावलेल्या सुरेश रैनाला (Suresh Raina) मोठा धक्का बसला. रैनाला 10 पैकी कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही. 2 कोटी रुपयांची बेस प्राईज ठेवलेला सुरेश रैना लिलावात अनसोल्ड राहिला. सुरेश रैना आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून रैना सीएसकेकडून (CSK) खेळत होता. जेव्हा सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली तेव्हा रैना गुजरात लायन्सचा कर्णधार होता, पण दोन वर्षांनी रैना पुन्हा सीएसकेमध्ये दाखल झाला. सुरेश रैना आणि एमएस धोनी (MS Dhoni) चांगले मित्र आहेत. धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा काही मिनिटांमध्येच रैनानेही निवृत्ती घेतली. सीएसकेचे चाहते धोनीला थला तर रैनाला चिन्नाथला नावाने संबोधतात, मग तरीही सीएसकेने रैनाला लिलावात विकत का घेतलं नाही, असा प्रश्न विचारण्यात येतोय. न्यूझीलंडचा माजी फास्ट बॉलर आणि कॉमेंटेटर सायमन डूल (Simon Doull) यांनी याचं कारण सांगितलं आहे. ‘रैनाचं पुनरागमन न होण्यासाठी दोन ते तीन कारणं असू शकतात, असं डूल यांना वाटतं. रैनाने 2022 च्या मोसमात युएईमध्ये टीमसाठीची त्याची इमानदारी गमावली, याबाबत फार बोलण्याचीही गरज नाही, हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण असू शकतं. रैनाने एमएस धोनी आणि टीमप्रती असलेला आपला विश्वास आणि इमानदारी गमावली. जर एकदाही असं झालं तर टीममध्ये पुनरागमन करणं कठीण होऊन जातं,’ असं सायमन डूल म्हणाले. कोरोना काळात झालेल्या आयपीएल 2020 मध्ये रैना सीएसकेसोबत युएईला गेला, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच तो भारतात निघून आला. सीएसकेच्या टीममध्ये तेव्हा कोरोना रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या भीतीने रैनाने भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पण युएईमधल्या हॉटेल रूमवरून रैना नाराज झाला आणि त्याने तडकाफडकी भारतात यायचं ठरवल्याचंही बोललं गेलं. चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन श्रीनिवासन यांनीही रैनाच्या डोक्यात हवा गेल्याची प्रतिक्रिया दिली होती. या सगळ्या वादानंतरही रैना सीएसकेसोबत आयपीएल 2021 खेळला, पण खराब फॉर्ममुळे त्याला प्लेऑफपासून टीममध्ये स्थान मिळालं नाही. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच रैना सीएसकेकडून प्लेऑफचे सामने खेळला नाही. ‘तुम्ही फिट नाही आणि शॉर्ट बॉलही खेळू शकत नाही, त्यामुळे खेळाडूला लिलावात कोणतीही टीम 2 कोटी रुपये देऊ शकत नाही. रैना आयपीएलचा महान खेळाडू आहे. 8-9 वर्ष त्याने उल्लेखनीय कामगिरी केली, पण त्याची वेळ आता संपली आहे,’ असं वक्तव्य डूल यांनी केलं. आयपीएलमध्ये खराब कामगिरी सुरेश रैनाने आयपीएलच्या मागच्या मोसमात सीएसकेकडून खेळताना निराशाजनक कामगिरी केली. 12 सामन्यांमध्ये 17.77 च्या सरासरीने त्याने फक्त 160 रन केले. आयपीएलमध्ये रैना सर्वाधिक रन करणारा चौथा खेळाडू आहे. 205 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 32.51 च्या सरासरीने 5528 रन केले, त्याचा स्ट्राईक रेटही 136.76 चा आहे. आयपीएलमध्ये रैनाने एक शतक आणि 39 अर्धशतकं केली. त्याचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 100 रन आहे, तसंच त्याने 203 सिक्स आणि 506 फोरही लगावल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.