मुंबई, 29 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL Auction 2022) चा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. आयपीएलच्या या मोसमात 8 ऐवजी 10 टीम खेळणार आहेत, त्यामुळे यंदाचा लिलावही मोठा असणार आहे. आयपीएल लिलावामध्ये 2015 म्हणजेच 7 वर्षांनी एक खेळाडू उतरणार आहे, या खेळाडूवर आयपीएल इतिहासातली सगळ्यात मोठी लागण्यचा अंदाज वर्तवला जातोय. हा खेळाडू आयपीएल लिलावाचे सगळे विक्रम मोडेल, असंही बोललं जातंय, कारण त्याच्याकडे बऱ्याच टीम कॅप्टन म्हणूनही पाहत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 2015 नंतर पहिल्यांदाच लिलावात उतरत आहे. आयपीएलमध्ये कॅप्टन होण्यासाठी अय्यरने दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडल्याचीही चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्स सोडल्यानंतर श्रेयस अय्यरला लखनऊ किंवा अहमदाबादची नवीन टीम विकत घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण लखनऊने केएल राहुलला तर अहमदाबादने हार्दिक पांड्याला टीमचं कर्णधार केलं. या दोन नव्या टीमसोबत करार न झाल्यामुळे श्रेयस अय्यर लिलावात उतरला आहे. कोलकाता, आरसीबी आणि पंजाब या तीन टीमना नव्या कॅप्टनची गरज लागणार आहे, त्यामुळे आयपीएल लिलावात या तिन्ही टीम श्रेयस अय्यरला विकत घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करू शकतात. तसंच रोहित शर्माचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी मुंबई इंडियन्सही श्रेयस अय्यरसाठी इच्छुक असल्याच्याही चर्चा आहेत. दिल्लीला मिळालं यश श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल 2020 साली दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीला आयपीएल फायनल गाठता आली होती, पण फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव केला. 2021 च्या मोसमासाठीही दिल्लीची टीम श्रेयस अय्यरकडेच कर्णधार म्हणून बघत होती, पण इंग्लंडविरुद्धच्या सीरिजवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे श्रेयस अय्यर आयपीएलमधून बाहेर झाला. श्रेयस नसल्यामुळे दिल्लीने ऋषभ पंतला (Rishabh Pant) कॅप्टन्सीची जबाबदारी दिली. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडआधी श्रेयस अय्यर फिट झाला, पण दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतकडेच टीमचं नेतृत्व ठेवण्याचा निर्णय घेतला, यानंतर श्रेयस मागच्या मोसमात पंतच्या नेतृत्वात खेळला. दिल्लीने यापुढच्या मोसमांसाठीही पंतकडेच कॅप्टन्सी देण्याचं ठरवल्यामुळे कॅप्टन्सीच्या भविष्यासाठी श्रेयस अय्यर दिल्लीतून बाहेर पडला. आयपीएल 2015 च्या लिलावात श्रेयस अय्यरला दिल्लीने 2.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आता 7 वर्षांनी तो पुन्हा एकदा लिलावात उतरत आहे. श्रेयस अय्यरला यावेळी मात्र मागच्या लिलावापेक्षा कित्येक पटींना जास्त रक्कम मिळेल हे निश्चित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.