बँगलोर, 12 फेब्रुवारी : आयपीएल 2022 च्या लिलावामध्ये (IPL Auction 2022) भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला नवी टीम मिळाली आहे. मोहम्मद शमीला (Mohammed Shami) गुजरात टायटन्सनं (Gujrat Titans) 6 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. मागच्या काही काळापासून मोहम्मद शमीची मर्यादित ओव्हरमधली कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही, त्यामुळे त्याला एवढी रक्कम मिळेल का नाही, याबाबत साशंकता होती. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर शमी भारताकडून टी-20 क्रिकेट खेळला नाही. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर मोहम्मद शमीवर मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली होती. एवढच नाही तर तो टी-20 फॉरमॅटचा बॉलर नसून त्याला फक्त टेस्ट क्रिकेटमध्येच संधी द्यावी, अशी मागणीही केली जात होती.
आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत शमी पंजाब किंग्सकडून खेळला, तसंच तो त्यांचा महत्त्वाचा फास्ट बॉलर होता, पण या मोसमाआधी शमीला रिलीज करण्याचा निर्णय पंजाब किंग्सने घेतला. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये शमी 9.55 च्या इकोनॉमी रेटने तर आयपीएलमध्ये 8.63 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग करतो. आयपीएलच्या 77 मॅचमध्ये शमीला 79 विकेट आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-20मध्य त्याने 17 मॅच खेळून 17 विकेट मिळवल्या आहेत.