मुंबई, 14 फेब्रुवारी : जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचा लिलाव (IPL Auction 2022) शनिवार आणि रविवारी पार पडला. दोन दिवसांमध्ये 204 खेळाडूंवर तब्बल 551.7 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या लिलावामध्ये काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले तर कुठे नावही न ऐकलेल्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. यातलंच एक नाव आहे कुलदीप सेन (Kuldeep Sen). अनेक अडचणींवर मात करत कुलदीपने क्रिकेटमध्ये नाव कमावलं. आता या अनकॅप खेळाडूला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विकत घेतलं आहे. 25 वर्षांच्या कुलदीप सेनला राजस्थान रॉयल्सनी त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं आहे. मध्यमगती बॉलर असलेला कुलदीप स्थानिक क्रिकेट मध्य प्रदेशकडून खेळतो. 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 43 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 18 टी-20 मध्ये त्याला 12 विकेट घेण्यात यश आलं आहे. फिटनेसबाबत कुलदीप कायमच सजग असतो, त्याच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमधूनही हे दिसतं. मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्याच्या हरिहरपूरमध्ये राहणाऱ्या कुलदीपने एक वेळ आर्थिक अडचणींचा सामना केला. कुलदीपचे वडील रामपाल सेन रिवामध्ये हेयर कटिंग सलून चालवायचे. घरची परिस्थिती हलाकीची असतानाही वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. घरामध्ये पैशांची कमी असली तरी त्यांनी कुलदीपच्या क्रिकेट करियरला कायमच प्रोत्साहन दिलं. आयपीएल लिलावात पहिल्यादांच त्याच्यावर बोली लागली आहे. सध्या तो गुजरातमध्ये सराव करत आहे. पाच भावा-बहिणींमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या कुलदीपच्या मनात 2014 साली क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार आला. त्याआधी तो रिवा शहरातच खेळायचा. पहिले त्याची रिवा क्रिकेट टीममध्ये निवड झाली, मग आपल्या क्षमतेच्या जोरावर त्याने 2018 साली रणजी ट्रॉफीमध्ये स्थान पटकावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.