चेन्नई, 14 फेब्रुवारी : अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याच्यावर आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction 2022) कोणत्याच टीमने बोली लावली नाही. रैना लिलावात अनसोल्ड राहिल्यामुळे अनेकांना धक्का बसला. अनेक वर्ष चेन्नई सुपरकिंग्सकडून (Chennai Super Kings) खेळल्यानंतर यावेळी रैनामध्ये कोणत्याच टीमनी रस दाखवला नाही. रैना खराब फॉर्ममध्ये असला तरी चेन्नई त्याला लिलावात विकत घेईल, असं बोललं जात होतं. आता चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी रैनाला विकत का घेतलं नाही, याचं कारण सांगितलं आहे. डावखुरा आणि आक्रमक बॅटर असलेला रैना आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएलच्या 205 सामन्यांमध्ये रैनाने 1 शतक आणि 39 अर्धशतकांच्या मदतीने 5,528 रन केले. सीएसकेवर जेव्हा दोन वर्षांची बंदी घालण्यात आली तेव्हा तो गुजरात लायन्सचाही कर्णधार होता. 2020 च्या आयपीएलसाठी रैना युएईला गेला होता, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच तो भारतात परतला. मागच्या मोसमातही त्याची कामगिरी निराशाजनक झाली. 12 सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने रैनाने 160 रन केले. चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी फ्रॅन्चायजीकडून एक व्हिडिओ क्लिप शेयर केली आहे. ‘रैना 12 वर्ष सीएसकेकडून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. रैनाला विकत न घेणं आमच्यासाठी खूप कठीण निर्णय होता. पण टीमचं संयोजन फॉर्म आणि खेळाडूंवरही अवलंबून असतं,’ असं विश्वनाथन म्हणाले. ‘फॉर्म आणि संयोजन याचं एक कारण आहे. तो या टीममध्ये फिट होऊ शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याचसोबत फाफ डुप्लेसिसची कमीही जाणवेल, असं काशी विश्वनाथन म्हणाले. फाफ 2011 पासून सीएसकेसोबत आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात फाफने चेन्नईला आयपीएल ट्रॉफी जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फाफ यावर्षी आरसीबीकडून खेळताना दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.