'स्थानिक खेळाडूंना घ्या, अन्यथा टीमचं नाव बदला', आमदाराची या IPL टीमला धमकी

'स्थानिक खेळाडूंना घ्या, अन्यथा टीमचं नाव बदला', आमदाराची या IPL टीमला धमकी

आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव (IPL Auction 2021) 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये पार पडला. पण या लिलावानंतर सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) टीमने स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

  • Share this:

हैदराबाद, 22 फेब्रुवारी : आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव (IPL Auction 2021) 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये पार पडला. पण या लिलावानंतर सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) टीमने स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या कारणामुळे हैदराबादच्या टीमवर टीकाही होत आहे. टीआरएस (TRS) पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र (Danam Nagendra) यांनी तर हैदराबादच्या टीममध्ये स्थानिक खेळाडू नसल्यामुळे टीम प्रशासनाला धमकीच दिली आहे. सनरायजर्स टीममध्ये हैदराबादच्या खेळाडूंची निवड व्हावी, अन्यथा फ्रॅन्चायजीने त्यांच्या नावातून हैदराबाद हे नाव काढून टाकावं, असं दानम नागेंद्र म्हणाले आहेत.

हैदराबादच्या खेळाडूंना टीममध्ये घेतलं नाही, तर जेव्हा आयपीएल मॅच हैदराबादमध्ये होईल, तेव्हा आपण आणि आपले समर्थक विरोध करू, असा इशाराही दानम नागेंद्र यांनी दिला आहे. 'आयपीएलच्या इतर टीममध्ये तिथले स्थानिक खेळाडू असतात, पण हैदराबादमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असजूनही फ्रॅन्चायजीने त्यांना संधी दिली नाही. निवड प्रक्रियेमध्येही गडबड झाली आहे, ज्याची आम्ही निंदा करतो. इकडून फक्त मोहम्मद सिराजच आयपीएलसाठी निघाला आहे. पण असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी रणजी ट्रॉफी आणि अंडर-19 स्पर्धेमध्ये आपली छाप पाडली. जर त्यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली, तर ते स्वत:ची क्षमता सिद्ध करतील. सनरायजर्स हैदराबादने याकडे दुर्लक्ष करता कामा नये,' अशी प्रतिक्रिया दानम नागेंद्र यांनी दिली.

डेव्हिड वॉर्नरला हैदराबादचा कर्णधार होण्यावरही दानम नागेंद्र यांनी आक्षेप घेतले आहेत. डेव्हिड वॉर्नरवर बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप आहे, त्यामुळे वॉर्नरला हैदराबादचा कर्णधार करायला आमचा विरोध आहे, असं दानम यांनी सांगितलं.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादने 2016 साली आयपीएल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2018 साली बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली, त्यामुळे वॉर्नरच्याऐवजी केन विलियमसनकडे हैदराबादचं नेतृत्व देण्यात आलं. पुढच्याच मोसमात वॉर्नरने धडाक्यात पुनरागमन केलं आणि हैदराबादसाठी 12 मॅचमध्ये 692 रन केले. मागच्या मोसमातही त्याने 16 मॅच खेळून 548 रन केले होते. वॉर्नरच्या या कामगिरीमुळे हैदराबाद मागच्या मोसमात प्ले-ऑफला पोहोचली होती.

आयपीएल लिलावात हैदराबादने फक्त तीन खेळाडूंना विकत घेतलं. यामध्ये जगदीश सुचित, केदार जाधव आणि मुजबी उर रहमान यांचा समावेश आहे.

हैदराबादची टीम

केन विलियमसन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, समद, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिचेल मार्श, विजय शंकर, मोहम्‍मद नबी, राशिद खान, ऋद्धीमान साहा, श्रीवत्‍स गोस्‍वामी, बसील थम्‍पी, जेसन होल्‍डर

Published by: Shreyas
First published: February 22, 2021, 4:53 PM IST

ताज्या बातम्या