कोलकाता, 19 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी लिलावाला सुरुवात झाली आहे. यात 332 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. दरम्यान या लिलावात सर्वात आधी ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर ख्रिस लीनवर बोली लागली. आयपीएलच्या लिलावात ख्रिस लीन सर्वात चर्चेत आलेला खेळाडू होता. कोलकाता संघानं रिलीज केल्यानंतर लीननं टी-10 लीगमध्ये धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यामुळं आयपीएलमध्ये त्यावर किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र मुंबई इंडियन्सनं 2 कोटी रुपयांना विकत घेतले. ख्रिस लीन गेल्या दोन हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होते. मात्र त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर टी-10 लीगमध्ये दमदार कामगिरीमुळं लीन पुन्हा चर्चेत आला. लीनला मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळाल्यामुळं रोहित शर्माला सलामीसाठी नवा पार्टनर मिळू शकतो. टी-10 लीगमध्ये लीननं 30 चेंडूत 91 धावा केल्या होत्या. त्यामुळं मुंबई इंडियन्ससाठी ही बोली फायद्याची असणार आहे.
First player to go under the hammer - Chris Lynn
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2019
तर, 2018मध्ये आयपीएलमध्ये लीननं 491 धावा केल्या होत्या, यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या 130 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकातानं प्ले ऑफमध्ये प्रवेश केलाहोता. मात्र तरी कोलकातानं तेराव्या हंगामात त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्समध्ये सामिल झाल्यामुळं रोहित शर्माला याचा फायदा होणार आहे. सध्या लिलावात चार वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई संघाकडे 13.50 कोटी होते. तर मुंबईला 5 भारतीय तर 2 विदेशी खेळाडू खरेदी करायचे होते. त्यामुळं आता मुंबईला 5 भारतीय आणि 1 विदेशी खेळाडू खरेदी करायचा आहे, त्यासाठी आता त्यांच्याकडे 11.50 कोटी आहेत.