मुंबई, 26 डिसेंबर : आयपीएल लिलावानंतर आता बीसीसीआयकडून 16 व्या हंगामाच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आयपीएल 2023 कधीपासून सुरू होणार यासाठी अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पण यावेळी आयपीएल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन 31 मे रोजी फायनल सामना खेळला जाईल असं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने आयपीएल 2023 चे नियोजन करताना 74 दिवस खेळवण्याची योजना होती. पण त्यात आयसीसीच्या नियमाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलचा 16 वा हंगाम हा 74 दिवसांऐवजी 60 दिवसांचा होऊ शकतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामुळे बीसीसीआयला आयपीएलची स्पर्धा 74 दिवस खेळवता येणार नसल्याची चिन्हे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून रोजी इंग्लंडमध्ये ओव्हलवर होणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या इव्हेंटआधी 7 दिवस आणि त्यानंतरचे 7 दिवस कोणत्याही स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकत नाही. महिला आयपीएलसुद्धा मार्च महिन्यात होणार आहे. याचे शेड्युल अद्याप आलेलं नाही. त्यामुळे बीसीसीआयकडे आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी 60 दिवसांचीच विंडो असेल.
हेही वाचा : IND vs SL: टीम इंडियामध्ये हार्दिक राज! Video Viral होताच चर्चेला उधाण
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितले की, जर तुम्ही पूर्ण विंडो पाहिली तर ती मोठी आहे. कारण महिला आयपीएल आणि त्यानंतर पुरुषांचे आयपीएल होणार आहे. ही विंडो जवळपास तीन महिन्यांची असेल. पण यावेळी आयपीएलचा कालावधी मोठा ठेवणं कठीण आहे. अद्याप तारखा निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्हीही केवळ लीग सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या तारखेची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सने घेतलेल्या गोलंदाजाचा बॉक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पंच
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याआधी सांगितले होते की, आयपीएल 2023साठी अडीच महिन्यांची विंडो आहे. पण आता बीसीसीआयसमोर नवं आव्हान आहे. 60 दिवसात आय़पीएलचा हंगाम संपवावा लागेल. कारण जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित आहे. तर भारताच्याही आशा अद्याप जिवंत आहेत. जर ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही देश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचले तर आयपीएलमध्ये या देशांचे खेळाडू अखेरच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2023, IPL auction, WTC ranking