मुंबई, 27 मार्च : आयपीएलच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या नव्या सीजनसाठी क्रीडा प्रेमी उत्साहित असून यंदा विजेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी संघ देखील कसून सराव करीत आहेत. केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यंदा पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 च्या पहिल्या सत्रातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. तेव्हा श्रेयसच्या अनुपस्थितीत केकेआरने संघाचे नेतृत्व धाकड फलंदाजाच्या खांदयावर सोपवले आहे. केकेआर संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सामन्यादरम्यान त्याची पाठीची दुखापत बळावली होती. त्यामुळे त्याला अर्ध्यातच मालिकेतील चौथा सामना सोडावा लागला. डॉक्टारांनी श्रेयसला पाठीच्या दुखापतीमुळे काही दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर यंदा आयपीएल 2023 च्या पहिल्या सत्राला मुकण्याची शक्यता आहे.
श्रेयसच्या अनुपस्थितीत कोणता खेळाडू कोलकाता नाईट ररायडर्स संघाचे नेतृत्व करणार यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. केकेआर संघाच्या चाहत्यांना देखील नवा कर्णधार कोण असणार याबाबत उत्सुकतात होती. मात्र आता केकेआर संघाने अधिकृत निवेदन जाहीर करून केकेआरच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
आयपीएल 2023 मध्ये श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरचा खेळाडू नितीश राणा याच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे. 2018 पासून नितीश राणा हा केकेआर संघाचा भाग असून त्याने संघासाठी आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आहे. नितीश राणा हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने 2016 रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या कारकिर्दीत 91 सामने खेळले असून 177 धावा आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. नितीश राणाची कर्णधारपदी नेमणूक करत असताना केकेआरने श्रेयस अय्यरला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.